गडचिरोली : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी गडचिरोली येथे भाजपवर सडकून टीका केली. काँग्रेसचा एक गट भाजपमध्ये जाणार ही भाजपकडूनच पेरलेली अफवा असल्याचेही चेन्नीथला म्हणाले.
देशात जातीय तेढ निर्माण करून भाजपची पुन्हा सत्तेवर येण्याची धडपड सुरु आहे. ‘ईडी’चा धाक दाखवून ते विरोधी पक्ष फोडण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र काँग्रेस भाजपच्या दबावाला बळी पडणार नाही. काँग्रेसचे सर्व नेते एकजुटीने येणाऱ्या निवडणुकांना सामोरे जाणार आहेत.
विभागीय आढावा बैठकीनिमित्त काँग्रेस नेते तथा महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला गडचिरोली दौऱ्यावर आले असता त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेचे जनआंदोलनात रूपांतर झाले आहे. देशातील सर्व सामान्य नागरिकांचा याला मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळाला. भाजपने सामजिक एकोप्याला धक्का न लावता राजकारण केले पाहिजे, पण भाजप तर राम मंदिराच्या नावावर निवडणुका लढविण्याची तयारी करीत आहे, असा घणाघात रमेश चेन्नीथला यांनी केला.
तर दुसरीकडे इंडिया आघाडीतील जागावाटपासंदर्भात चर्चा सुरू असून लवकरच यावर एकमत होईल असेही ते म्हणाले.तसेच इंडिया आघाडीत सामील होण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांची चर्चा सुरू आहे. लवकरच यावर सकारात्मक तोडगा निघेल, असेही ते म्हणाले. या पत्रकार परिषदेला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, सुनील केदार, शिवाजीराव मोघे यांच्यासह काँग्रेसचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते.