मुंबई:लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही निवडक महिलांना दिवाळी बोनस मिळणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरु आहे. मात्र ही केवळ अफवा असल्याची माहिती समोर आली आहे.
सोशल मीडियावर महिलांना अडीच हजार रुपये दिवाळी बोनस भेटणार, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. महिला वर्ग आता याची वाट बघत आहेत. मात्र, हे वृत्त खरं की खोटं याबाबत सध्या तरी संभ्रमच आहे. दरम्यान,सूत्रांनुसार योजनेतील पात्र महिलांना दिवाळी बोनस देण्याबाबत कोणताही शासन निर्णय झालेला नाही.
लाडक्या बहिणींना बोनसबाबतचे वृत्त खोटं असून सरकारकडून अशी कोणतीच घोषणा झालेली नसल्याचे आदिती तटकरे यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले. इतकंच नाही तर, लाडक्या बहीणींना मोबाईल गिफ्ट मिळणार असल्याचेही बोलले गेले. मात्र, याबाबतही कोणताच शासन निर्णय घेण्यात आलेला नाही. याशिवाय आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे सरकारकडून अशा प्रकारची कोणतीही घोषणा होणार नाही. त्यामुळे दिवाळी बोनस मिळणार, अशा फक्त अफवा पसरवल्या जात आहेत.
योजनेसंबंधी कोणतीही माहिती घेण्यासाठी सरकारच्या संकेतस्थळावर जाऊनच खात्री करून घ्या. अन्यथा लाडक्या बहीणींची फसवणूक केली जाऊ शकते, असे आवाहनही करण्यात येत आहे.