नागपूर – आपल्या सैनिकांनी बलिदान दिले म्हणून आपण इथे सुरक्षित आहोत. त्यांच्या परिश्रमाने, त्यांच्या रक्ताच्या थेंबांनी देशाचा इतिहास लिहिला गेला आहे. त्यामुळे देशाच्या गौरवशाली इतिहासात सैनिकांच्या बलिदानाचे महत्त्व मोठे आहे. त्यांना कधीही विसरता येणार नाही, या शब्दांत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
सशस्त्र सेनेतील शहीदांप्रती तसेच सेवानिवृत्त सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सोहळा आयोजित करण्यात आला. ‘आर्मड् फोर्सेस व्हेटरन्स डे’चे यंदा ९वे वर्ष होते. वायूसेनानगर येथील एअरफोर्स कॅम्पसमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी ना. श्री. नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच एअर मार्शल विजयकुमार गर्ग, व्हाइस अॅडमिरल किशोर ठाकरे, एअर मार्शल श्री. देव आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शहीद सैनिकांच्या कुटुंबियांचा तसेच सेवानिवृत्त सैनिकांचा ना. श्री. गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘आपल्या देशासाठी सैनिकांनी खूप मोठे बलिदान दिले आहे. देशाचे रक्षण करताना अनेकांचे प्राण गेले. तर अनेक जण आपले कर्तव्य बजावल्यानंतर सेवानिवृत्त झाले आहेत.
वीरांची परंपरा हा आपल्यासाठी कायम अभिमानाचा विषय राहिला आहे. आपले सैनिक युद्धामध्ये बलिदान देतात त्यामुळे आपण इथे सुरक्षित आहोत. ते कुठल्या परिस्थितीत देशाचे रक्षण करतात हे मी स्वतः अनुभवले आहे. काश्मीरमध्ये मायनस चार डिग्री तापमानात आपले सैनिक सीमेवर रक्षण करत असतात, हे मी बघितले आहे.’
ना. श्री. गडकरी सत्कारमूर्तींपर्यंत गेले!
देशासाठी लढताना ज्यांनी प्राणांची आहुती दिली, अशा सैनिकांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते. तसेच देशासाठी लढून विशेष पदक घेणारे सेवानिवृत्त सैनिक देखील उपस्थित होते. यातील काही वयोवृद्ध सैनिक तसेच वयोवृद्ध वीर माता व वीर पीता यांचा सत्कार करण्यासाठी ना. श्री. गडकरी स्वतः व्यासपीठावरून खाली उतरले. ते स्वतः सत्कारमूर्तींपर्यंत गेले आणि त्यांचा सत्कार केला. हे दृष्य उपस्थितांना भारावून सोडणारे होते.