- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे समता प्रतिष्ठानचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न
- समता प्रतिष्ठानच्या प्रतिक व ब्रीदवाक्यचा अनावरण सोहळा
- केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती
नागपूर: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्मिती करून देशात समानता आणली. त्या संविधानाने सामान्य व्यक्तीला जी शक्ती प्रदान केली, त्या शक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे प्रस्थापित झालेले
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान’ मोलाची कामगिरी करेल, असा विश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे व्यक्त केला.
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन, दीक्षाभूमी परिसर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानचे उद्घाटन तसेच प्रतिष्ठानच्या प्रतिक आणि ब्रीदवाक्याचे अनावरण आज त्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले, महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री व समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजकुमार बडोले, महाराष्ट्राचे सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. दिलीप कांबळे, महाराष्ट्राचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रामुख्याने उपस्थित होते.
दीक्षाभूमीवर ६१ व्या धम्मचक्र प्रर्वतन दिनाच्या मंगलप्रसंगी महाराष्ट्र शासनाच्या वतीने समता प्रतिष्ठानचा एक चांगला उपक्रम सुरू झाला . केंद्र शासनाच्या डॉ. आंबेडकर फाऊंडेशनच्या धरतीवर समाजातील प्रतिभावंताना न्याय देणे, विविध समाजपयोगी उपक्रमाच्या माध्यमातून व संशोधनाला चालना देण्याच्या हेतूने समता प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आल्याची माहिती फडणवीस यांनी यावेळी दिली.
राज्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व सामाजिक न्याय प्रस्थापित व्हावा या हेतूने केंद्राच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनच्या धरतीवर समता प्रतिष्ठानची स्थापना झाली आहे. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून शालेय उपक्रम, जातीविहीन समाजनिर्मितीसाठी आंतरजातीय विवाह सोहळे इत्यादींचे आयोजनही केले जाईल, अशी माहिती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडतांना महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री व समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजकुमार बडोले यांनी दिली.
दीक्षाभूमीजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे दुस-या माळ्यावर सध्या कार्यरत असलेले ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान’ हा महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय मंत्रालयाचा एक उपक्रम असून या प्रतिष्ठानच्या वतीने ग्रंथालय, अध्ययन केंद्र, संशोधन संस्था यांची स्थापना करण्यात येणार आहे. विविध प्रकारच्या शैक्षणिक ऊपक्रमाच्या माध्यमातून संशोधन कार्यास चालना देणे, मागासवर्गातील समाज घटकांसाठी कार्य करणा-या स्वयंसेवी संस्थाना डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराच्या माध्यमातून प्रोत्साहन देणे, जातीविहीन समाजाकरीता राज्यस्तरीय आंतर-जातीय विवाह सोहळे आयोजित करणे इत्यादी उपक्रम या प्रतिष्ठानच्या वतीने राबवण्यात येणार आहे.
महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय मंत्रालयातर्फे प्रतिष्ठानच्या प्रतिक व ब्रीदवाक्य यांच्या डिझाईनसाठी घेण्यात येणा-या स्पर्धेत अनुक्रमे गणेश तायडे व भंते सारीपुत्त यांना प्रथम पुरस्कार मिळाला. या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री व समता प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष दिलीप कांबळे यांनी केले. या कार्यक्रमास महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय विभागाचे सचिव व प्रतिष्ठानचे सदस्य दिनेश वाघमारे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन संस्था पुणेचे महासंचालक व प्रतिष्ठानचे सदस्य सचिव राजेश ढाबरे, स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते.