Published On : Fri, Mar 11th, 2022

दुप्‍पट उत्‍साहात होणार ‘खासदार सांस्‍कृतिक’चा दुसरा टप्‍पा

Advertisement

महापौर दयाशंकर तिवारी यांच्‍या हस्‍ते कार्यालयाचे उद्घाटन
19 ते 24 मार्च दरम्‍यान होणार आयोजन

नागपूर: कोविड महामारीच्‍या पार्श्‍वभूमीवर राज्‍य सरकारकडून लादण्‍यात आलेल्‍या निर्बंधामुळे डिसेंबर महिन्‍यात आयोजित खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाचे अंतिम दोन कार्यक्रम स्‍थगित करण्‍यात आले होते. आता कोविडचे सावट ओसरले असून सरकारी निर्बंधही शिथिल झाले आहेत. त्‍यामुळे केंद्रीय मंत्री खासदार नितीन गडकरी यांच्‍या इच्‍छेनुसार खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाचा दुसरा टप्‍पा 19 ते 24 मार्च दरम्‍यान दुप्‍पट उत्‍साहात साजरा करण्‍यात येईल, असे मत महापौर दयाशंकर तिवारी यांनी व्‍यक्‍त केले.

Advertisement

ईश्वर देशमुख कॉलेज ग्राउंडमध्‍ये गुरुवारी खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्‍या कार्यालयाचे उद्घाटन महापौर दयाशंकर तिवारी यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. तसेच, आयोजन स्‍थळाचे भूमिपूजनदेखील मान्‍यवरांच्‍या हस्ते करण्‍यात आले. याप्रसंगी आयोजन समितीचे अध्‍यक्ष प्रा. अनिल सोले, सर्व उपाध्‍यक्ष डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, कोषाध्‍यक्ष प्रा. राजेश बागडी, सर्व सदस्‍य बाळ कुळकर्णी, संदीप गवई, संजय गुळकरी, रेणुका देशकर, आशिष वांदिले, भोलानाथ सहारे, किशोर पाटील, स‍ुनिल मित्रा यांची प्रमुख उपस्‍थ‍िती होती.

भाजपाने चार राज्‍यात निवडणुक जिंकल्‍यामुळे कार्यकर्त्‍यांमध्‍ये उत्‍साह असून खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाच्‍या आयोजनामुळे हा उत्‍साह द्विगुणित होईल, असे महापौर म्‍हणाले.

प्रा. अनिल सोले म्‍हणाले, महोत्‍सवाच्‍या पहिल्‍या टप्‍प्‍यात गायक व संगीतकार शंकर महादेवन व अभिनेत्री नृत्‍यांगना हेमामालिनी यांचा कार्यक्रम सरकारी निर्बंधामुळे होऊ शकला नव्‍हता. त्‍यामुळे तरुणाईमध्‍ये नाराज होती. पण दुस-या टप्‍प्‍यात या दोन मोठ्या कलावंतांसह आणखी सुनिधी चव्‍हाण, जावेद अली, साईराम अय्यर यांच्‍यासारखे मोठे गायक, सुरेंद्र शर्मा यांच्‍यासह इतर लोकप्रिय व्‍यंग कवी सहभागी होणार असल्‍याचे सांगितले. याशिवाय, उन्‍हाळा लक्षात घेता व्‍यवस्‍थाही चोख करण्‍यात येणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

प्रास्‍ताविकातून प्रा. राजेश बांगडी यांनी महोत्‍सवाचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवेंद्र दस्‍तुरे यांनी केले.