नवी दिल्ली : महाराष्ट्राचा सत्तासंघर्षाचा निकाल कुणाच्या बाजूने लागणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. आज तो बहुप्रतिक्षित निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून शिंदे सरकार वाचले आहे.
शिंदे गटाच्या व्हिपची नियुत्ती विधानसभा अध्यक्षांनी बेकादेशीररित्या केली, शिवसेनेत दोन गट पडलेले असताना आणि दोन व्हिप असताना विधानसभाध्यक्षांनी चौकशी करणे गरजेचे होते. पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या मान्यतेने कोण व्हिप आहे, हे विधानसभाध्यक्षांनी तपासायला हवे होते, असे निरीक्षण घटनापीठाने केले. तसेच तत्कालिन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कार्यपद्धतीवर न्यायालयाने बोट ठेवले. तसेच १६ आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे सोपवत आहोत, असंही न्यायालयाने म्हटले आहे.हा उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का मनाला जात आहे.
दरम्यान एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केल्यानंतर भाजपसोबत सत्ता स्थापन केली. सत्तांतरानंतर गेले १० महिने सुरू असलेल्या राज्यातील सत्तासंघर्षाचा न्यायालयीन निर्णय आज, गुरुवारी देण्यात आला. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने यावर ऐतिहासिक निकाल दिला.