मुंबई: राज्यात तयार होणाऱ्या मद्याची बेकायदेशीर वाहतूक व विक्री होऊ नये, यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने ट्रॅक अॅन्ड ट्रेस पद्धतीचा अवलंब करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
वर्षा निवासस्थानी आयोजित राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. या बैठकीला राज्य उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव एस.के. श्रीवास्तव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डी. के. जैन, विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस. व्ही. आर. श्रीनिवास, राज्य उत्पादन शुल्क आयुक्त अश्विनी जोशी आदींसह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कामाचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. यामध्ये इज ऑफ डुईंग बिझनेस अंतर्गत राज्य उत्पादन शुल्कच्या विविध परवान्यांचे सुलभीकरण करण्यात यावे तसेच अवैध दारू विक्रीला प्रतिबंध घालण्यासाठी वाहनांची व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टीम वापरण्यात यावी. सोबतच डिजिटल व भौतिक सुरक्षेची माध्यमे वापरून मद्याचे गुणनियंत्रण करण्यात यावे. यासंबंधी चर्चा करण्यात आली.