नागपूर. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचे नाव देशात आणि जगातील कानाकोपऱ्यात गाजेल. त्यांच्या नेतृत्वात राज्यातील सर्व समाजाला सर्वसमावेशक दुरदृष्टीने न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त करीत भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष व प्रवक्ते ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या.
आपल्या शुभेच्छा संदेशाच्या व्हिडिओमध्ये ॲड. धर्मपाल मेश्राम म्हणाले, २०१४ ते २०१९ या कार्यकाळात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला विकासाच्या नव्या वाटेवर नेताना विकासाचे नवे मापदंड निर्माण केले. त्यानंतर २०१९ ला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही वैयक्तिक स्वार्थाच्या गद्दारीपोटी देवेंद्र फडणवीस यांना विरोधी पक्षनेते पद भूषवावे लागले. या विरोधी पक्षनेते पदाच्या कार्यकाळातही संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत अत्यंत ताकदीने आणि निकराने सगळे विरोधात बसलेले असताना देखील त्यांनी जबरदस्त लढा दिला.
त्यानंतर अडीच वर्षाच्या उपमुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात कोरोनावर मात करीत महाराष्ट्रातील शेतकरी, दलित, पीडित, कष्टकरी, कामगार, लाडक्या बहिणी या सर्वांना न्याय देत त्यांनी अडीच वर्षाची उपमुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ गाजवला. आज महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना संपूर्ण बहुमत देत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यासाठी राज्यात नवे रस्ते सुकर केले.
नागपूरच्या या सुपुत्राने महाराष्ट्राचे नाव देशाच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यात न्यावं आणि देशातल्या सर्व समाजाला सर्वसमावेशक दूरदृष्टीने न्याय देण्यासाठी प्रयत्न करावे, अशा शुभेच्छा देखील ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी दिल्या.