नागपूर – आजचा नागरिक कसा असावा, त्याला उत्तम नागरिक म्हणून कसे घडविले पाहिजे, याला व्यक्तिनिर्माण म्हणतात. हेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सांगितले जाते. आपण कार्यकर्त्याला गुणदोषांसह स्विकारत असतो. कारण कुणीही परफेक्ट नाही. आपण सगळे अपुर्णांक आहोत. आपण विद्यार्थी जीवनात विद्यार्थी परिषदेत काम करताना आपले व्यक्तिमत्व कसे घडविले जाणार आहे, याचे चिंतन करण्याची गरज आहे. कारण विद्यार्थी परिषद तुमचे व्यक्तिमत्व घडविणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (मंगळवार) केले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ५३व्या विदर्भ प्रांत अधिवेशनाला रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात सुरुवात झाली. अधिवेशनातील ‘रिअल लाईफ रोल मॉडेल’ या सत्रात ना. श्री. गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी प्रांत अध्यक्ष श्रीकांत परबसन, सुनील गौरदीपे, मोहिनी हेडाऊ, प्रशांत कुकडे आदींची उपस्थिती होती. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संस्थापक स्व. दत्ताजी डिडोळकर यांच्या जीवनचरित्रावर संबंधित व्हिडिओचे लोकार्पण ना. श्री. गडकरी यांच्या हस्ते झाले.
ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘ज्ञान चरित्र एकता… यही हमारी विशेषता, हे आपल्याला विद्यार्थी परिषदेत शिकायला मिळते. मी विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता होतो. विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षण संस्था या सर्वांचा एक शैक्षणिक परिवार असावा, अशी परिषदेची संकल्पना आहे. विद्यार्थ्यांचे कर्तृत्व कसे घडवता येईल, यादृष्टीने संस्कार करणारी एक संघटना म्हणून परिषदेचा लौकीक आहे. आजचा विद्यार्थी हा उद्याचा नव्हे तर आजचा नागरिक आहे.’
‘विद्यार्थी परिषदेत प्रत्येक जण काहीतरी शिकलेला आहे. मी व्यक्तिगतरित्या काम सुरू केले, तेव्हा माझी रुची महाविद्यालयीन निवडणुकांमध्ये होती. पण मला इतरही अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. घाईने राजकारणात जायला नको, याची शिकवणही मिळाली. उत्तम प्रशिक्षण, संस्कार झाल्याशिवाय राजकारणात जायला नको, हे मदनदासजींनी सांगितले. पाच वर्षे उत्तम काम करायचे आणि त्यानंतर राजकारणात जायचे, असे त्यांनी मला सांगितले होते. मला राजकारणात यायची घाई नव्हती. पण त्यांच्या उपदेशांचा मला फायदा झाला,’ असेही ना. श्री. गडकरी म्हणाले.
संघटनात्मक कार्य, रचनात्मक कार्य आणि आंदोलनात्मक कार्य, या तीन गोष्टींचा विद्यार्थी परिषदेत वारंवार उल्लेख होतो. ‘चलो जलाए दीप वहाँ जहाँ अभी भी अंधेरा है’, हा आपला मुख्य उद्देश आहे. वंचितांचे आयुष्य बदलविण्याचे काम कसे करता येईल, याचा विचार करणे आपले काम आहे. समाजोपयोगी काम करण्यावर भर देण्याची गरज आहे. जिथे समस्या आहेत, जिथे अज्ञान आहे, तेथील लोकांचे सामाजिक, आर्थिक जीवन बदलविण्याचे काम आपले आहे. सामाजिक संवेदनशीलता आपल्या कामातून व्यक्त होत असते, असेही ना. श्री. गडकरी म्हणाले.