Published On : Thu, Apr 29th, 2021

रूग्णालयांच्या मागणीनुसार होणार पुरवठा

Advertisement

रेमडेसिवीर वितरणाबाबत विभागीय आयुक्त समन्वय ठेवतील

कोरोना नियंत्रणासाठी प्रशासकीय यंत्रणा युध्दपातळीवर कार्यरत

Gold Rate
Tuesday18 March 2025
Gold 24 KT 88,700 /-
Gold 22 KT 82,500 /-
Silver / Kg 100,900 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर :- जिल्हयातील कोरोनाबाधितांचे बरे होण्याचे वाढते प्रमाण दिलासादायक आहे. ऑक्सिजन व बेडच्या मागणीत कालपासून किंचीत घट झाली असली तरी कोरोनाचे सध्याचे संकट पाहता जिल्हयात दररोज 200 मेट्रीक टन ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे. या ऑक्सिजनचे योग्य वितरण करण्याचे आदेश केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज प्रशासनाला दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत पालकमंत्री डॉ. नितीन राऊत ऑनलाईन सहभागी झाले होते. दोन्ही मंत्री महोदयांच्या संयुक्त बैठकीत ऑक्सिजन पुरवठा, सिलिंडर खरेदी ऑक्सिजन प्लांटपाईपलाईन, रेमडेसिवीच्या नियोजनाबाबत चर्चा झाली. आमदार आशिष जैस्वाल, विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्यासह वाहतुकदार संघटनेचे प्यारेखान उपस्थित होते.

सध्या जिल्हयात उत्पादित ऑक्सिजन व्यतिरिक्त 140 मेट्रीक टन ऑक्सिजन भिलाईतून येत आहे. त्यामुळे 160 मेट्रीक टनाच्या जवळपास ऑक्सिजन रोज उपलब्ध होत आहे. जिल्हयाची गरज 160 मेट्रीक टन असली तरी 200 मेट्रीक टन इतक्या मुबलक प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध असल्यास शासकीय व खासगी रूग्णालयांची गरज चांगल्या पध्दतीने भागवता येईल. सर्व रूग्णालयांच्या मागणीनुसार ऑक्सिजन पुरवठा करता येईल. पुरवठा झाल्यावर संबंधीत वाहतूकदारांचे देयक जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तात्काळ अदा करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. राऊत यांनी दिले.

तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने अल्पमुदतीच्या उपाययोजनांचा हा भाग आहे. ही तात्पुरती उपाययोजना झाली आहे. मात्र दीर्घकालीन उपाययोजनांत ऑक्सिजन प्लांट उभारणी हेच लक्ष्य असल्याचे गडकरी यांनी सांगितले. विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी लागणारी सर्व प्रकारची तांत्रिक मदत करण्याबाबत त्यांनी यावेळी आश्वस्त केले. 24 तासात जिल्हयात वाहतुकीसह 200 मेट्रीक टन ऑक्सिजन उपलब्ध करून देण्याच्या दृष्ट्रीने वाहतूक, ड्रायव्हर, ट्रकच्या फेऱ्या, देखभाल दुरुस्तीसह सर्व नियोजन व जबाबदारी प्यारेखान यांना देण्यात आली आहे.

सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांतील बाधितांवर सुरु असलेल्या ऑक्सिजन उपचार पध्दतीसह गृह विलगीकरणातील रूग्णांवर ऑक्सिजन सिलिंडर लावून उपचार सुरू असल्याने सिलिंडरची मागणी वाढली आहे. त्यामुळे सध्या जिल्हयात असलेले 20 हजार सिलिंडरही अपुरे पडत आहे. हे पाहता महनगरपालिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी सिलिंडर खरेदीची प्रक्रीया अत्यंत जलद गतीने करावी. चीनमध्ये मोठया क्षमतेचे ॲल्युमिनीअमचे सिलेंडर वापरतात त्याची व्यावहारिकता तपासावी असेही गडकरी यांनी सांगितले.

कोरोना नियंत्रणात प्रशासनाने युद्ध सदृश्य परिस्थितीत चौकटीबाहेरचा विचार करून प्रत्येक रूग्णाचा जीव वाचवला पाहिजे. या जाणिवेने व सहृदयतेने काम करावे. खरेदीसह आवश्यक त्या सगळया तांत्रिक प्रक्रीयांमध्ये पालकमंत्री व केंद्रीयमंत्री प्रशासकीय यंत्रणांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे उभय मंत्र्यांनी स्पष्ट केले. बेड वाढवताना अस्तित्वात असलेल्या हॉस्पिटलमध्ये क्षमता वाढ केल्यास पूरक सोयी सुविधा सहज उपलब्ध होतात त्यामुळे त्यादृष्टीने कार्यवाही केली तर बेड तातडीने वाढतील असेही सुचविण्यात आले. मेडिकल-मेयो मध्ये रुग्ण नातेवाईकांना बसण्याकरिता तसेच वेळप्रसंगी रुग्णांना प्रतीक्षालय म्हणून डोमची उभारणी तातडीने करावी असेही मंत्री महोदयांनी निर्देश दिले.

वर्धा येथील रेमडेसिवीर उत्पादक कंपनीव्दारे निर्मित 30 हजार इंजेक्शनचा पहिला साठा 10 मेपासून येईल. त्यामुळे रुग्णांना ते मुबलक व सहजरित्या उपलब्ध् करून देण्यासाठी नागपूर व अमरावती विभागनिहाय वितरण व समन्वयन संबंधित विभागीय आयुक्त करतील. विदर्भातील सर्व जिल्हयांना प्राथम्याने रेमडेसिवीर उपलब्ध झाल्यानंतर गरजेनुरूप ते राज्याच्या अन्य भागाला देण्यात येईल. विदर्भाची ऑक्सिजन व रेमडेसिवीरची गरज तातडीने पूर्ण करण्यास यश आल्यास राज्यावरील भार हलका करण्यास मदत होईल.

जिल्हयातील हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या जुबीली, अमोघा ऑक्सी, आसी या उत्पादकांशी यावेळी चर्चा करून गडकरी यांनी वस्तुस्थिती जाणून घेतली.

आज 400 ऑक्सिजन कॉन्सट्रेंटर मशीन व 300 व्हेंटीलेंटर प्राप्त होत असुन चार्मोशी, एटापल्ली, सिरोंचा व अन्य तालुक्यातील शासकीय रूग्णालयांना पाठविणार असल्याचे तसेच 9 रुग्णवाहिका शासकीय यंत्रणेला देणार असल्याचे गडकरी यांनी यावेळी सांगितले.

Advertisement
Advertisement