नागपूर : शहरातील रामन विज्ञान केंद्राच्या अधिकृत जी-मेल आयडीवर धमकीचा ई-मेल आल्याने खळबळ निर्माण झाली. याप्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी केंद्राची तपासणी करीत मेलकरणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. माहितीनुसार, नागपुरातील रामन विज्ञान केंद्राला 5 जानेवारीला पहाटे साडेचार वाजता धमकीचा ईमेला आला. त्यानंतर यासंदर्भात केंद्राने गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
या धमकीची माहिती नागपुरातील गणेशपेठ पोलिसांनी मिळताच त्यांनी रामन विज्ञान केंद्र गाठून संपूर्ण तपासणी केली. मात्र, त्याठिकाणी काहीच आढळून आले नाही. याप्रकरणी देशभरातील संग्रहालय आणि विज्ञान केंद्राना असे ई-मेल पाठवल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.
दरम्यान नागपुरातील रामन सायन्स सेंटर आणि रामन तारांगण कॉम्प्लेक्स हे मुंबईतील नेहरू विज्ञान केंद्राशी संलग्न असलेले परस्परसंवादी विज्ञान केंद्र आहे. नागपूरला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या यादीतील महत्वाचे आणि अग्रस्थानी असलेले ठिकाण असून दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक याठिकाणी भेट देतात.