नागपूर: रेल्वे अपघातात जिवंत राहण्याची शक्यता कमीच असते आणि अपघातात वाचला तरी कायमचे अपंगत्व येते. मात्र, सोमवारी झालेल्या अपघातात असे काहीच झाले नाही. तो धावत्या रेल्वेतून खाली पडला, तरीही तो सुखरुप आहे. केवळ त्याच्या डोक्याला तीन टाके आणि हाताच्या बोटाला गिट्टीमुळे खरसटले आहे. या घटनेवरुन काळ आला होता, पण वेळ आली नव्हती असेच म्हणावे लागेल.
शौकत सलिम मंडल (३६, रा. कोलकाता) असे त्या प्रवाशाचे नाव आहे. तो कुकचे काम करतो. अहमदाबाद – हावडा प्रेरणा एक्स्प्रेसने प्रवास करीत होता. त्याला कोलकात्याला जायचे होते. प्रेरणा एक्स्प्रेस नागपूर पर्यंतच असल्याने येथून गाडी बदलविणार होता. दरम्यान गुमगाव जवळ गाडी असताना अचानक तो खाली पडला. गाडीतील प्रवाशांनी आरडा ओरड केली. तर एका जागरुक प्रवाशाने चेन पुलिंग करुन गाडी थांबविली. शौकत रुळावरच पडून होता. त्याला गँगमनने उचलून त्याच गाडीने नागपुरला आणले. तत्पूर्वी तशी सूचना लोहमार्ग पोलिसांना दिली. नागपुरात गाडी येताच एएसआय विजय मरापे यांनी लगेच त्याला मेयो रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी उपचार करुन त्याला सुटी दिली. कारण त्याला किरकोळ जखम होती. डोक्याला तीन टाके लागले आणि हाताच्या बोटाला जखम होती. आता तो सुखरुप आहे.