Published On : Wed, Feb 27th, 2019

येणारे शैक्षणिक सत्र मनपा शाळांसाठी प्रेरणादायी सुरुवात ठरेल : अतिरिक्त आयुक्त राम जोशी

Advertisement

विद्यार्थ्यांच्या अध्ययन स्तर निश्चितीकरिता कार्यशाळेचे उद्‌घाटन

नागपूर : आपल्या मनपा शाळांतील विद्यार्थी कोणत्याही बाबतीत कमी नाहीत. त्यांच्यात प्रतिभा आहे मात्र आत्मविश्वासाच्या अभावाने विद्यार्थी मागे पडतात. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट पूर्ण करीत असताना विद्यार्थी आत्मविश्वासाने पुढे यावेत यासाठीही प्रयत्न करण्याची गरज आहे.

Gold Rate
Thursday 09 Jan. 2025
Gold 24 KT 78,700 /-
Gold 22 KT 73,200 /-
Silver / Kg 91,200 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आज महानगरपालिकेच्या शाळांबाबत नागरिकांची असलेली समजूत बदलविण्यासाठी नागपूर महानगरपालिकेकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत व यामध्ये विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष सहभागही घेण्यात येत आहे. मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांच्या अध्ययन स्तर निश्चितीकरिता ‘असर’च्या सहकार्याने होणारे सर्वेक्षण हा सर्वांसाठी सकारात्मक बदल असणार आहे. त्यामुळे येणारे २०१९-२० शैक्षणिक सत्र हे मनपा शाळांसाठी प्रेरणादायी सुरूवात ठरणार आहे, असा विश्वास अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी व्यक्त केला.

मनपा शाळांतील इयत्ता दुसरी ते आठवीच्या शंभर टक्के विद्यार्थ्यांची अध्ययन स्तर निश्चितीकरीता ‘असर’च्या सहकार्याने सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणासंदर्भात बुधवारी (ता.२७) महाल येथील राजे रघुजी भोसले नगर भवन येथे मनपा शाळातील शिक्षकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी उपायुक्त राजेश मोहिते, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, डीआयसीपीटीचे प्राचार्य रवींद्र रमतकर, जिल्हा परिषद नागपूरचे कार्यक्रम अधिकारी प्रमोद वानखेडे, मनपा कार्यक्रम अधिकारी धनलाल चौलीवार, माध्यमिक सहायक शिक्षणाधिकारी कुसूम चाफलेकर, सहायक शिक्षणाधिकारी प्रिती बंडेवार उपस्थित होते.

पुढे बोलताना अतिरिक्त आयुक्त राम जोशी म्हणाले, जिल्ह्यात विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी ‘असर’च्या सहकार्याने घेण्यात आलेला पुढाकार स्त्युत्य आहे. मनपाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गुणात्मक व सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. मनपाकडून विद्यार्थ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून दिला जातो. मात्र या उपक्रमांची माहिती पालकांपर्यंत पोहोचत नाही. हे उपक्रम, या योजना पालकांसह विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी योग्य संवाद घडण्याची आवश्यकता आहे. यासाठी आपल्या मनपा शाळांतील विद्यार्थ्यांमार्फतही अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणता येऊ शकेल, असेही अतिरिक्त आयुक्त राम जोशी म्हणाले.

उपायुक्त राजेश मोहिते म्हणाले, गेल्या काही वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यासाठी शासनस्तरावर अनेक प्रयत्न केले जात आहेत. मुले व मुलींचे गळतीचे प्रमाण कमी करणे, विद्यार्थ्यांच्या मुलभूत क्षमता विकसीत करणे, अत्याधुनिक तंत्रज्ञान, साहित्यांचा वापर करून आनंददायी शिक्षण पद्धती विकसीत करण्याबाबत अंमलबजावणी सुरू आहे. नागपूर महानगरपालिकेच्या शाळा राज्यात अग्रस्थानावर याव्यात यासाठी प्रशासनाच्या स्तरावर आवश्यक ते प्रयत्न सुरू आहेत. लवकरच याचा सकारात्मक प्रतिसाद आपल्याला दिसणार आहे. ‘असर’च्या सहकार्याने सुरू करण्यात आलेले सर्वेक्षण वेळोवेळी मार्गदर्शक ठरेल व विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये त्याचे मोठे सहकार्य लाभेल, असा विश्वास उपायुक्त राजेश मोहिते यांनी व्यक्त केला.

डीआयसीपीटीचे प्राचार्य रवींद्र रमतकर यांनी कार्यशाळेची संकल्पना स्पष्ट केली. मनपा शाळांमधील इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन स्तर निश्चीतीकरणासाठी ‘असर’ने पुढाकार घेतला असून यामध्ये मनपाच्या शिक्षकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. मनपा शाळांमधील शिक्षकांकडूनच हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

यासाठी मनपाच्या शिक्षकांना मनपाच्या मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी माध्यमाच्या वेगवेगळ्या शाळांमध्ये ‘असर’चे टूल वापरून विद्यार्थ्यांच्या स्तर निश्चितीकरणासाठी सर्वेक्षण करावे लागणार आहे. ‘असर’चे टूल वापरून स्तर निश्चितीकरण करणारा नागपूर जिल्हा राज्यात पहिला ठरणार आहे. सर्वेक्षणाद्वारे गोळा केलेली माहिती सर्व शिक्षक मार्चअखेरीस विभागीय आयुक्त व मनपा आयुक्तांपुढे सादर करतील. या माहितीचे मूल्यमापन करून त्याचा फायदा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्‍यासाठी होणार आहे, असेही डीआयसीपीटीचे प्राचार्य रवींद्र रमतकर यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या अध्ययन स्तर निश्चितीकरीता मनपा शाळांमधील इयत्ता दुसरीच्या १४०३, तिसरीच्या १५६८, चौथीच्या १६०४, पाचवीच्या १७०३, सहावीच्या १८३६, सातवीच्या १९४२ व आठवीच्या २१७६ विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे संचालन प्रतिभा लोखंडे यांनी केले. आभार कार्यक्रम अधिकारी धनलाल चौलीवार यांनी मानले.

Advertisement