नागपूर:पुण्यातील कल्याणीनगर भागात महागड्या पोर्श कारने तरुण आणि तरुणीला चिरडण्याचे प्रकरण ताजे असतानाच नागपुरात आशाच प्रकारच्या घटना समोर आल्या आहेत. यातील एक म्हणजे गिट्टीखदान पोलीस स्टेशन अंतर्गत अज्ञात वाहन चालकाने दोन महिलांना चिरडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ममता संजय आदमे (५५ वर्षे) आणि वंदना अजय पाटील अशी गंभीर जखमी झालेल्या महिलांची नावे आहेत.
माहितीनुसार, ७ मे रोजी ममता आदमे या वंदना पाटील यांच्यासोबत सकाळी ७ वाजता मॉर्निग वॉकला निघाल्या.त्यावेळी मागून आलेल्या स्विफ्ट कारने दोघींनाही धडक दिली. यात दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्या.दोन्ही महिलांवर शुअरटेक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
ही धक्कादायक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या घटनेनंतर ममता आदमे यांनी गिट्टीखदान पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात कलम २७९,३३७ भादंवि सह कलम १३४,१७७ मो.वा.कायद्यानंर्गत गुन्हा दाखल केला आहे.
मात्र घटनेला इतके दिवस उलटूनही पोलिसांकडून तपासात टाळटाळ करण्यात येत असल्याचा आरोप ममता यांचे भाऊ किशोर खरणोरकर यांनी केला.
‘नागपूर टुडे’ने यासंदर्भात पोलीस निरीक्षक विनोद कालेकर यांच्याशी संवाद साधला.कालेकर म्हणाले की,ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यावरून आम्ही आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.