नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी शहरात प्रत्येक झोनमध्ये एक विरंगुळा केंद्र तयार करण्यात येत आहे. शनिवारी (ता.२१) धरमपेठ झोनमध्ये बांधण्यात येणाऱ्या विरंगुळा केंद्राचे भूमिपूजन अंबाझरी उद्यानात महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी धरमपेठ झोन सभापती प्रमोद कौरती, उपनेत्या व नगरसेविका वर्षा ठाकरे, नगरसेविका परिणिता फुके, नगरसेवक अमर बागडे, विभागीय परिवहन कार्यालयाचे प्रमुख शरद जिचकार प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, विरंगुळा केंद्र ही एक अतिशय सुंदर संकल्पना आहे. आयुष्याच्या उत्तरार्धात समवयस्क व्यक्तींनी एकत्र येऊन आनंदाचे काही क्षण घालवावे. पुस्तके वाचावी. गाणी म्हणावी, इनडोअर खेळ खेळावे ही कल्पनाच आनंद देऊन जाणारी आहे.
आता प्रत्येक झोनमध्ये असे विरंगुळा केंद्र उभारून ज्येष्ठ नागरिकांसाठी हक्काचे स्थान निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.