महापौर आपल्या दारी: मंगळवारी झोनमधील समस्या जाणून घेतल्या
नागपूर: मंगळवारी झोनअंतर्गत येणा-या प्रभाग क्रमांक १० व ११ मधील जास्तीत जास्त समस्या सोडविण्यावर भर देणार असल्याचे आश्वासन महापौर नंदा जिचकार यांनी दिले. महापौरांनी नागपूर शहरातील नागरिकांच्या झोननिहाय समस्या व प्रश्न जाणून घेण्यासाठी महापौर आपल्या दारी हा उपक्रम हाती घेतला आहे. आज (ता.२७) महापौर नंदा जिचकार यांनी मंगळवारी झोनमधील प्रभाग क्रमांक १० व ११ येथील वस्त्यांची पाहणी केली व नागरिकांशी संवाद साधला.
यावेळी त्यांच्यासमवेत कर आकारणी व कर संकलन समिती सभापती संदीप जाधव, वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती मनोज चापले, जलप्रदाय समिती पिंटू झलके, नासुप्र विश्वस्त भूषण शिंगणे, मंगळवारी झोन सभापती संगिता गि-हे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेविका अर्चना पाठक, दीपक गि-हे, नरेश बरडे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, सहायक आयुक्त विजय हुमने, कार्यकारी अभियंता गिरिश वासनिक, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) मनोज गणवीर, आरोग्य अधिकारी डॉ. सुनील कांबळे, विद्युत अधिकारी सालोडकर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील झोननिहाय, प्रभागनिहाय समस्या ऐकून घेण्यासाठी, महत्त्वाच्या समस्यांवर, प्रश्नांवर तात्काळ निर्णय घेण्यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे ३ डिसेंबर ते ११ फेब्रुवारीदरम्यान प्रत्येक सोमवारी झोननिहाय जनता दरबार घेणार आहे. या जनता दरबाराची पूर्वतयारी म्हणून महापौर नंदा जिचकार यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. मंगळवारी महापौरांनी झिंगाबाई टाकळी, गि-हे ले- आऊट, काळे व राऊत ले- आऊट, अलंकार सोसायटी, गोरेवाडा, मानकापूर येथील शिवाजी कॉम्पलेक्सची पाहणी केली.
यावेळी या ठिकाणच्या नागरिकांच्या समस्या महापौरांनी जाणून घेतल्या. झिंगाबाई टाकळी परिसरात कचरा संकलन केंद्र कमी असल्याची नागरिकांची तक्रार होती. त्यावर बोलताना महापौरांनी नागरिकांनी ठरवून एक जागा सुचवावी, त्यावर संकलन केंद्र तयार करता येईल, असे आश्वासन दिले. दहा झोनसाठी दहा कचरा संकलन केंद्र तयार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. परिसरात असलेल्या नाल्यामध्ये कचरा व घाण करण्या-याविरूद्ध कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापौरांनी दिला. परिसरातील नाले हे मोकळे करा, नाल्यातील घाण स्वच्छ करून त्यातील झाडे – झुडपे काढून टाकून नदी प्रवाह मोकळे करण्याचे आदेश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.
गि-हे ले आऊट परिसरामध्ये पावसाचे पाणी दोन – ते तीन दिवस पर्यंत साचून राहते, अशी नागरिकांची तक्रार होती. याशिवाय येथे मोकळे भूखंड मोठ्या प्रमाणावर आहेत. मोकळ्या भूखंडावर असलेले झाडे झुडपे हे त्वरित हटवावे, व ज्यांचे भूखंड आहे त्यांना नोटीस बजावण्यात यावा, असे निर्देश महापौरांनी दिले. या ठिकाणी एक वाचनालय व्हावे, ही मागणी नागरिकांनी केली, यावर बोलताना महापौर यांनी अर्थसंकल्पात तरतूद केली असल्याचे सांगितले.
यानंतर महापौरांनी बंधुनगर, अलंकार सोसायटी, शिवाजी कॉम्पलेक्स, गोरेवाडा याठिकाणी जाऊन तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. ओसिडब्लूने केलेले खोदकाम व त्यांचे पुनर्भरण नीट न केल्याने पाईपलाईन लिक झालेल्या आहेत, त्या तातडीने दुरूस्त करण्याचे आदेश दिले. परिसरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात यावा, असे आदेश महापौरांनी दिले. अंलकार सोसायटीमध्ये पथदिव्यांची मागणी नागरिकांनी केली. गोरेवाडा येथील परिसरातील घरांवरून ११ हजार मेगावॅटची विद्युत तार गेली आहे. यासंबंधी महावितरण विभागाकडून नोटीस बजावण्यात आला आहे. त्यावर लक्ष वेधत ही तार अंडर ग्राउंड करण्यात यावी, अशी मागणी केली असता, महापौर नंदा जिचकार यांनी आमदार सुधाकर देशमुख यांनी यासाठी निधीचे प्रावधान केली असल्याचे सांगितले. यावेळी सर्व संबंधित विभागाचे अभियंता, आरोग्य निरीक्षक व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
महापौर आपल्या दारी उपक्रमांतर्गत महापौर नंदा जिचकार बुधवार २८ नोव्हेंबर रोजी प्रभाग क्र. १ आणि ९ चा दौरा करतील.