नागपूर : महाराष्ट्रात महिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच असतानाच राज्यातील महिला पोलीसही असुरक्षित असल्याचे चित्र दिसत आहे. राज्यातील आठ महिला पोलिसांवर त्यांच्या तीन वरिष्ठांनीच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या कार्यालयातही महिला पोलीस शिपायावर अत्याचार झाल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. या घटनेबाबत स्वत: वडेट्टीवार यांनी एक्सवर ट्विट करत सरकार आणि पोलीस प्रशासनावर निशाणा साधला.
राज्यातील महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी ज्या खात्याकडे आहे तेथीलच महिला कर्मचारी जर सुरक्षित नसेल तर राज्यातील इतर महिलांच्या सुरक्षेचे काय होणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. पोलीस दलात कर्तव्यावर असताना होत असलेल्या अत्याचारामुळे महिला कर्मचाऱ्यांमध्येही आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलीस दल, सत्ताधाऱ्यांकडून न्याय मिळत नसल्यामुळे महिला पोलीस कर्मचारी विरोधी पक्षनेत्यांना पत्र लिहून न्याय मागत असेल तर सध्याच्या सरकारमध्ये पोलीस विभाग आतून किती पोखरला गेला आहे, हे स्पष्ट होते. गृहखात्याने पोलीस दलात महिलांवर होत असलेल्या लैंगिक अत्याचाराची, छळाची आता तरी गांभीर्याने दखल घ्यावी आणि आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली आहे.