मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा वादंग पेटले आहे. यापार्श्वभूमीवर जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्लावरून महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे.विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केले. सरकार कुणबी प्रमाणपत्र देत असेल, तर मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देणार का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. मराठा आरक्षणाला आरक्षण देत असाल, तर ओबीसी आरक्षणाचा टक्का वाढवा. टक्का वाढवून देत नसाल, तर आम्ही मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ देणार नाही, अशी रोखठोक भूमिका वडेट्टीवार यांनी घेतली. ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
आंदोलनाची मूळ मागणी कुणबी जात प्रमाणपत्राची आहे. ओबीसींचे आरक्षण न वाढवता प्रमाणपत्र देण्यास सुरूवात झाल्यास काय करणार? असा उलट सवालही वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.मराठा आणि ओबीसींमध्ये भांडण लावण्याचे काम करू नये. एकीकडे सरकार वेगळी तर बावनकुळे वेगळी भूमिका घेतात. जनतेची दिशाभूल कारण्याचे काम या सरकारकडून सुरु आहे.जालन्यातील लाठीहल्ला हा सरकार पुरस्कृत होता,हे सिद्ध झाले असल्याचेही वडेट्टीवार म्हणाले.