नागपूर : समाजातील विविध घटकांना शासन आर्थिक मदत करीत आहे.पण जो उन ,वारा आणि पाऊस याची तमा न बाळगता रात्रंदिन प्रवाशांची वाहतूक करीत आहे. त्याच्या हक्काचे वेतनवाढीच्या फरकाचे व महागाई भत्त्याच्या फरकाचे ३२०० कोटी रुपये शासन का देत नाही? शासनाने एसटी महामंडळाचे कर्मचाऱ्यांकडे सुद्धा लक्ष द्यावे व त्यांच्या हक्काचे ३२०० कोटी रुपये मिळण्यासाठी आर्थिक मदत करावी, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप यांनी सरकारला लगावला आहे.
आज काँग्रेस भवन, नागपूर येथे झालेल्या एसटी कामगारांच्या भव्य राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांची प्रलंबित देणी देण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे.भविष्य निर्वाह निधी व उपदान सारख्या रक्कमा वेतनातून कपात करून सुद्धा निधी अभावी संबंधित ट्रस्टकडे भरणा झालेला नाहीत. ही अनियमितता पीएफ ऑफिसच्या लक्षात आली तर ट्रस्टवर कारवाई होऊ शकते. पण त्या मुळे एसटीच्या व्यवस्थापनाला काही फरक पडणार नाही.
कर्मचारी मात्र अडचणीत सापडू शकेल.म्हणून पीएफ व ग्र्याजुटीचे १९०० कोटी रुपये, एसटी बँकेचे १५० कोटी रुपये या कर्मचाऱ्यांच्या थकीत रक्कमा त्या संस्थांना भरण्यासाठी सरकारने आर्थिक मदत केली पाहिजे असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या शिवाय एसटी कामगारांना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हल्लीच ६५०० रुपयांची सरसकट वेतनवाढ केली आहे. ही वेतनवाढ वेतन आयोगा एवढी नसली तरी वेतन आयोगाच्या जवळ पोहोचण्याचा प्रयत्न झाला आहे. त्या बद्दल सरकारचे अभिनंदन करतो.पण ही वेतन वाढ इतर घोषणा सारखी निव्वळ पोकळ घोषणा ठरायला नको.
या घोषणेची पोकळी भरून काढायची असेल व कर्मचाऱ्यांना त्यांच्या जानेवारी पासून वाढलेल्या चार टक्के महागाई भत्त्याच्या फरकाची रक्कम तसेच मार्च २०२० पासूनची वेतनवाढ फरकाची अशी एकूण साधारण ३२०० कोटी रुपये इतकी रक्कम कर्मचाऱ्याना द्यायची असेल तर सरकारने आर्थिक मदत करावी तरच थकीत रक्कम देण्याचा प्रश्न निकाली निघेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पी. एफ. अँडव्हान्स रक्कम,वैद्यकीय बिले, रजा रोखिकरण, पी.एफ .व ग्राज्युटी या सर्व रक्कमा द्यायच्या असतील तर त्या साठी किमान ४ ते ५ हजार कोटी रुपये इतकी रक्कम लागणार असून सरकारने एक वेळचा पर्याय म्हणून ही रक्कम देण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, या साठी सरकारला विनंती करण्यात येणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले
या मेळाव्यात संघटनेला नेहमी मदत करणारे नवनिर्वाचित आमदार विकास ठाकरे, व आमदार अमित झनक तसेच प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष नाना गावंडे , सचिव अभय साळुंखे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाला नागपूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाबा आष्टनकर, संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे, विजय बोरगमवार, दिनेश धुमाळे, एम. टी. खान,फैय्याज पठाण, चंदन राठोड, राजेश सोलापण, मनीष बत्तुलवार, जयंत मुळे, शंकर पाटकर,मनीषा कालेशवार, पराग शेंडे, प्रवीण चरपे, प्रमोद गुंडतवार, विनोद दातार, पुष्पा तपासे, चंद्रकांत देशमुख, किशोर पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.