मुंबई :महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. न्यायालयाने शिंदे सरकारच्या बाजूने निकाल दिला असून ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जातो. सर्वोच्च न्यायालयापूर्णपणे घटनात्मक ठरवलेल्या सरकारच्या वतीने पत्रकार परिषदेत मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली . यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. फडणवीस यांनी यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या संदर्भात आज जो निकला दिला आहे. या निकालाबद्दल आम्ही पूर्ण समाधान व्यक्त करतो. आणि निश्चितपणे लोकशाहीमध्ये लोकमताचा आज पूर्णपणे विजय झालेला आहे, असे फडणवीस म्हणाले.
मी उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद पहिली.त्यात ते म्हणाले की, मी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला. माझा त्यांना सवाल आहे की भारतीय जनता पक्षासोबत निवडून आलात आणि काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेलात तेव्हा ही नैतिकता कुठल्या डब्यात बंद करुन ठेवली होती? असा सवाल उपस्थित करत फडणवीस यांनी ठाकरेंवर ताशेरे ओढले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सर्वैच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करत ठाकरेंवर निशाणा साधला. आपल्या लोकशाहीत अपेक्षित निकाल लागला आहे. अखेर सत्याचा विजय झाला. लोकशाहीत बहुमताला महत्त्व आहे. आम्ही घटनात्मक बाबींची काळजी घेऊनच सरकार स्थापन केले आहे. त्यांच्याकडे राजीनामा देण्याशिवाय दुसरा कोणता पर्याय होता? आम्ही हा निर्णय घेताना जनमताचा आदर केला आहे. खरंतर नैतिकता कुणी जपली, हे मला सांगण्याची गरज नाही, असे म्हणत शिंदे यांनीही उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.