नागपूर: शहरात विविध ठिकाणी सीमेंट रस्त्याचे काम सुरू आहे. सीमेंट रस्त्याच्या गुणवत्तेत तडजोड नको, असा स्पष्ट इशारा स्थायी समिती सभापती विरेंद्र कुकरेजा यांनी दिला. बुधवारी (ता.२) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात शहरातील सीमेंट रस्त्याच्या टप्पा १ आणि २ च्या कामाचा आढावा त्यांनी घेतला.
यावेळी त्यांच्यासमवेत मुख्य अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) अनिरूद्ध चौंगजकर, कार्यकारी अभियंता (लोककर्म)मोती कुकरेजा, कार्यकारी अभियंता (स्लम) डी.डी.जांभुळकर प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी शहरातील विविध सीमेंट रस्त्याच्या कामाचा आढावा सभापतींनी कार्यकारी अभियंत्यामार्फत घेतला. रस्त्याच्या कामात कोणतीही हलगर्जी चालणार नाही, असा कडक इशारा त्यांनी दिला. रस्त्याला लागणारे सामान हे उच्च प्रतीचे वापरण्यात यावे, त्यात दिरंगाई आढळली त्या कंत्राटदाराचे देयक थांबविण्यात येईल, असा कडक इशारा सभापती कुकरेजा यांनी दिला.
टप्पा १ आणि २ ची कामे ३० जूनपर्यंत पूर्ण होईल या दृष्टीने प्रयत्न करावे. जी कामे शक्य होणार नाही, ती कामे किमान हिवाळी अधिवेशनापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश सभापती कुकरेजा यांनी दिले. दोन रस्त्यामधील भाग समतल करण्यात यावा, असे निर्देश सभापती विरेंद्र कुकरेजा यांनी दिले.
ज्या ठिकाणी पोलिस परवानगी मिळत नाही त्या ठिकाणी कंत्राटदारांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्याचा पाठपुरावा करण्याचे निर्देश सभापतींनी यावेळी दिले. सीमेंट रस्त्यासोबतच त्याठिकाणी ड्रेनेज लाईन व फुटपाथचे कामही व्यवस्थित करावे, असे निर्देश त्यांनी दिले. बैठकीला मनपाचे उपअभियंता आणि कंत्राटदार उपस्थित होते.