Published On : Mon, Jan 6th, 2025
By Nagpur Today Nagpur News

पालकमंत्रिपदाबाबत कोणताही तिढा नाही; दोन दिवसांत निर्णय!

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची स्पष्टोक्ती
Advertisement

* बीड प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा होईल
* झुडपीतील घरे कायदेशीर करू
* ठाकरेंची मोदींवर बोलण्याची लायकी नाही

नागपूर : भाजपा- महायुती सरकारमध्ये पालकमंत्रिपदाबाबत कोणताही तिढा नसून, उपमुख्यमंत्री अजित पवार हे परदेशात गेले होते, त्यामुळे चर्चा झाली नाही. पालकमंत्रिपदासंदर्भात फारतर दोन दिवसांत निर्णय होईल, असा विश्वास महसूल मंत्री व भाजपा प्रदेशाध्यक्ष चन्द्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

Gold Rate
Tuesday 21 Jan. 2025
Gold 24 KT 79,700 /-
Gold 22 KT 74,100 /-
Silver / Kg 92,000 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

त्यांनी आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर सद्यस्थिती माध्यमांसमोर सांगितली. बावनकुळे म्हणाले,” विदर्भातील झुडपी जंगलाचा प्रश्न सांगण्यासाठी ही भेट होती. तथापि, काही विषयांवर चर्चा झाली.

ते म्हणाले,” विदर्भात ८६ हजार हेक्टर झुडपी जंगल जमिनी आहेत. त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. काही झुडपी जंगल जमिनी विभागीय आयुक्तांकडून सोडवण्यासाठीचा अहवाल सादर झाला आहे. या झुडपी जंगल जमिनींवर काही लोकांची घरे आहेत. ती घरे कायदेशीर करून देण्यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे, ही घरे कायदेशीर करण्यासंदर्भात लवकरच प्रक्रिया सुरू होणार आहे, असे ते म्हणाले.

मोदींची टाचणीइतकीही बरोबरी अशक्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं आयुष्य छोट्या चहाच्या दुकानातून सुरू केलं. मोठा संघर्ष करून ते पंतप्रधानपदापर्यंत पोहोचले आहेत. नरेंद्र मोदी यांच्या संपूर्ण आयुष्याचा अभ्यास केला, तर उद्धव ठाकरे हे मोदी यांच्याबरोबर टाचणीइतकीही बरोबरी करू शकत नाही. उद्धव ठाकरे यांना समजले पाहिजे, की नरेंद्र मोदीनी त्यांचे संपूर्ण आयुष्य १४० कोटी जनतेसाठी समर्पित केले आहे. त्यांचं समर्पण आणि त्याग हा सूर्यप्रकाशाइतका स्वच्छ आहे, असे सांगून ते म्हणाले,” अतिविलासी उद्धव ठाकरे मातोश्री-२मध्ये कसे राहतात, कसा अतिविलास करतात, अडीच वर्षे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कसा अतिविलास केला, हे सर्व ‘सामना’मध्ये छापून आलं असतं, तर बरं झालं असतं. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी अतिविलासावर बोलू नये. खरं तर केजरीवालांच्या ‘शीशमहल’ला सपोर्ट करण्यासाठी उद्धव ठाकरे हे बोलत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीवर बोलण्याची उद्धव ठाकरे यांची लायकी नाही. त्यांनी आधी आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि मग मोदींवर बोललं पाहिजे, अशी टीका बावनकुळे यांनी केली.

आरोपीला कठोर शिक्षा होणार

आमदार सुरेश धस यांच्याशी माझे २-३ वेळा बोलणे झाले आहे. धस यांनी कोणतीही गोष्ट जाहीरपणे उघड करण्याऐवजी सरकारकडे मांडली पाहिजे. त्यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही चर्चा झाली..पुन्हा बोलतील. आपली जी भूमिका सरकारशी संबंधित असेल ती सरकारसमोर आणि पक्षाशी संबंधित जी भूमिका असेल, ती माझ्यासमोर मांडली पाहिजे. परंतु, बीड हत्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी सगळ्या प्रकारची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणातील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा होईल.

संयुक्त समितीचा अहवाल लवकरच येईल
वक्फ बोर्डाच्या कायद्यासंदर्भातील पुढील कृतीबाबत केंद्र सरकार विचार करत आहे. लोकसभेची संयुक्त समिती त्या संदर्भात गठित झाली आहे. वक्फ बोर्डाने हिंदू देवस्थानच्या बळजबरीने जप्त केलेल्या जमिनी, सर्वसामान्य जनतेच्या जमिनी किंवा कोणत्याही मालमत्ता ज्या वक्फ बोर्डाकडे चुकीच्या पद्धतीने गेल्या आहेत, त्या परत मिळाल्या पाहिजे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकार काम करत आहे, अशी माहिती बावनकुळे या वेळी दिली.

भाजपचे सदस्य होण्यासाठी मोठा ओघ
सदस्यनोंदणीच्या माध्यमातून दीड कोटी सदस्यसंख्या असलेला पक्ष करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्हाला ३ कोटी ११ लाख मतं मिळाली आहेत. मोदी यांच्या नेतृत्वात आम्हाला मोठं यश दिलं आहे. हे डबल इंजिन सरकार आहे. या डबल इंजिन सरकारवर जनतेचा विश्वास आहे. त्यामुळे भाजपचे सदस्यत्व घेण्यासाठी सामान्य जनतेचा मोठा ओघ आमच्याकडे असल्याचे बावनकुळे म्हणाले.
—–

Advertisement