नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीवेळी नागपूर (दक्षिण-पश्चिम) मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यावेळी त्यांनी सादर केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दोन गुन्हे लपवल्यासंदर्भात त्यांच्या विरोधात न्यायालयात खटला सुरु आहे. याप्रकरणी आता धक्कादायक बाब समोर आली आहे.
प्रतिज्ञापत्रात दोन गुन्ह्यांचा उल्लेख करण्याचे राहून गेल्याचा खुलासा ॲड. उदय डबले यांनी न्यायालयात केला आहे. या सुनावणीवेळी फडणवीस यांनी उमेदवारीची कागदपत्रे भरताना अर्ज क्रमांक २६ मध्ये २२ गुन्ह्याच्या माहितीचा उल्लेख केला होता. मात्र, २ खासगी गुन्ह्याचा उल्लेख करण्याचे सुटल्याची माहिती ॲड. उदय डबले यांनी न्यायालयात दिली आहे. माझ्या नजरचुकीमुळे निवडणूक प्रतिज्ञापत्रात या दोन गुन्ह्यांचा उल्लेख करण्याचं राहून गेलं होतं. ही बाब ही मुद्दामहून लपवली नाही. फडणवीस यांनी माझ्यावर विश्वास ठेवून निवडणूक प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी केली आहे, असे डबले न्यायालयात म्हणाले.
फडणवीस विरोधात ॲड. सतीश उके यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सुरुवातीला हे प्रकरण स्थानिक न्यायालयात, नंतर उच्च न्यायालयात, त्यानंतर सर्वोच न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही पक्षाची बाजू ऐकून घेत हे प्रकरण न्यायदंडाधिकारी न्यायालयात वर्ग केले. याप्रकरणी जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू असून ६ मे २०२३ रोजी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ जून रोजी होणार आहे.