नागपूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेतच्या ऑडी कारने एका दुचाकी वाहनासह पाच गाडयांना धडक दिली. या घटनेवरून विरोधकांनी भाजपाला घेरले.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांनी संकेत बावनकुळे हा मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी काँग्रेसने आपल्या मित्रपक्षापेक्षा वेगळी भूमिका घेतली आहे. नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी याप्रकरणी राजकारण करण्यात अर्थ नाही,पोलिसांनी निष्पक्ष तपास करावा असे म्हटले.
संकेत बावनकुळे वाहनात उपस्थित होता, मात्र तो वाहन चालवत नव्हता. अपघात झाल्यापासून मी या प्रकरणाचा शोध घेत असून, पोलिसांच्या सतत संपर्कात आहे, अशी भूमिका विकास ठाकरे यांनी घेतली.
अपघातादरम्यान कारमध्ये संकेत यांच्यासह अर्जून जितेंद्र हावरे (२४) आणि रोनित चिंतमवार (२७) होते. यातील हावरे हे कार चालवीत होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. सेंट्रल बाजार रोडवरुन ते भरधाव जात होते. सेटर पॉईंट हॉटेलसमोर संकेतच्या कारने पाच वाहनांना धडक दिली. या धडकेत जीवितहानी झाली नसली तरी कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.