नागपूर: उत्तर नागपुरातील मौजा नारा येथील खसरा क्रमांक १६१, १६२ (भाग), १६४ ते १७५, २०३, २०४, २०५, २११, २१२ आणि २१३ मौजा नारा एकूण क्षेत्र ५२.६३ हेक्टर (१३२.५२ एकर) जागा नागपूर विकास आराखड्यानुसार ‘पार्क (एन १६६)’ या आरक्षणाकरिता प्रस्तावित आहे.
उपरोक्त आरक्षणाअंतर्गत येत असलेली जमीन नासुप्रतर्फे या जागेवारील आरक्षणाखालील क्षेत्र भूसंपादनाच्या माध्यमातून संपादीत करण्याची कार्यवाही करण्यात आली होती. मध्यंतरीच्या काळात या भागाकरिता शासनाच्या दि. २७.०८.२०१९ च्या शासन निर्णयानुसार संपूर्ण शहराकरिता नागपूर महानगरपालिका नियोजन प्राधिकरण होते. आता शासनाच्या दि. ०९.०४.२०२१ च्या शासन निर्णयानुसार या भागाकरिता नासुप्रला पुन्हा नियोजन प्राधिकरणाचे अधिकार प्राप्त झाले.
या नारा पार्कचे आरक्षण विकसित करण्याकरिता प्रयन्त करीत आहे. नासुप्र उपरोक्त जमीन TDR च्या माध्यमातून संपादीत करण्याचा विचार करत असून दि. ०२.१२.२०२० रोजी मंजूर एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीतील तरतूद क्र. ११.१ नुसार जमीन मालकांना TDR चा पर्याय देऊन ‘पार्क’चे आरक्षण विकसित करण्यास प्रयत्नशील आहे. नासुप्रतर्फे कुठलाही सदर पार्कचे आरक्षण अनारक्षित करण्याकरिता प्रस्ताव शासनास वर्ग करण्यात आलेला नाही. त्यामुळे नासुप्र नारा येथील आरक्षित पार्कच्या जमिनीवर ‘पार्क’ होण्याबाबत प्रयत्नशील राहणार आहे, असे नासुप्रचे सभापती श्री. मनोजकुमार सुर्यवंशी यांनी स्पष्ट केले आहे.