भारतीय जनता पक्षाने रविवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. नागपूर शहरातील सहापैकी तीन जागांवर पक्षाने विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली.दक्षिण-पश्चिम नागपुरातून देवेंद्र फडणवीस, पूर्व नागपुरातून कृष्णा खोपडे तर दक्षिण नागपुरातून मोहन मते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
तर उत्तर नागपूर, मध्य नागपूर आणि पश्चिम नागपुरातून अद्यापही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र या मतदारसंघावर काही प्रबल दावेदार आहेत. ज्यात प्रवीण दटके आणि धर्मपाल मेश्राम या नेत्यांच्या नावांची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
उत्तर नागपुरातील धर्मपाल मेश्राम यांच्या नावाची चर्चा-
सूत्रांनी सांगितले की, उत्तर नागपुरातील धर्मपाल मेश्राम यांचे नाव पुढे आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत नितीन राऊत यांच्या विरोधात पराभूत झालेले डॉ.मिलिंद माने हेही संभाव्य उमेदवार असले तरी मेश्राम हे माने यांच्यापेक्षा जास्त ताकदवान मानले जातात. उत्तर नागपुरातून भाजपच्या दुसऱ्या यादीत धर्मपाल मेश्राम यांच्या नावाचा समावेश होण्याची दाट शक्यता आहे.
मध्य नागपुरातून प्रवीण दटके यांची पकड मजबूत –
भाजपकडून मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातून विधानपरिषद सदस्य प्रवीण दटके यांना रिंगणात उतरवून विकास कुंभारे यांचा पत्ता कट करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. असे झाल्यास हलबा वर्ग भाजपच्या विरोधात जाऊ शकतो. दटके यांना रिंगणात उतरवल्यास हलबा मतदारांना आकर्षित करता यावे यासाठी काँग्रेस रमेश पुणेकर यांना उमेदवारी देऊ शकते.