नागपूर : नागपूर शहर देशातील प्रमुख विकासशील शहरांपैकी एक मानलं जातं. शहराचा विस्तार आणि लोकसंख्या वाढत असताना, गुन्हेगारीचं प्रमाणही वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी सांगितलं की, कायदा-सुव्यवस्था आणि गुन्ह्यांचा आढावा घेऊन शहर व ग्रामीण भागाचे पुनर्रचना (रिस्ट्रक्चरिंग) करण्यात येत आहे. याच अंतर्गत, कामठीला स्वतंत्र झोन ६ बनवण्याची आणि शहरात एक अतिरिक्त एसीपी व एक एसीपी ट्रॅफिक पद वाढवण्याची मागणी गृह मंत्रालयाकडे करण्यात आली आहे.
अवकाळी पावसामुळे नागपूर आणि आसपासच्या भागात पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर नागपूरच्या सिव्हिल लाईन्स येथील नियोजन समितीच्या कार्यालयात बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. बैठकीपूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि विविध प्रश्नांची उत्तरे दिली.
नागपूर ग्रामीण भागात सात नवीन पोलिस ठाण्यांच्या स्थापनेबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृह विभागाची आणि सुरक्षा यंत्रणांची समीक्षा केली. यामध्ये स्पष्ट झाले की, नागपूर जिल्ह्यात चार ते पाच नवीन पोलिस ठाण्यांची गरज आहे. त्याचप्रमाणे शहरातही पाच पोलिस ठाण्यांची गरज आहे. अॅडिशनल सीपी, डीसीपी यांच्यासाठी कामठीला स्वतंत्र झोन ६ म्हणून विकसित करण्याची गरज आहे. नागपूर शहर व ग्रामीण भागाची पुनर्रचना आणि काही पोलिस ठाण्यांचा विस्तार करणे आवश्यक आहे.
जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि पोलिस ठाण्यांमधील अंतर लक्षात घेता, संपूर्ण यंत्रणा पुन्हा आखली जात आहे. आम्ही गृह मंत्रालयाकडे एक अतिरिक्त पोलीस आयुक्त, एक एसीपी ट्रॅफिक यांची पदे निर्माण करण्याची मागणी केली आहे. कामठीला स्वतंत्र डीसीपी झोन ६ म्हणून मान्यता देण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.
दरम्यान पुढील काळात नागपूर शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचे अधिक चांगले नियोजन पाहायला मिळेल,असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.