नागपूर : महाराष्ट्रात आठवड्याभरापूर्वी पोलीस अधिकाऱ्यांच्या सार्वत्रिक बदल्या झाल्या. यादरम्यान नागपूर शहर पोलीस दलातून १२ पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी बदलून गेले तर ८ पोलीस निरीक्षक शहरात रुजू झाले. यातच ठाणेदारांचा दोन वर्षांचा कार्यकाळ संपला आहे. यापार्श्वभूमीवर आयुक्तालयाअंतर्गत पोलीस निरीक्षकांमध्ये मोठे फेरबदल होणार आहे. यावेळी अनुभवी अधिकाऱ्यांना ‘ठाणेदारी’ मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे.
याअगोदर झालेल्या बदल्यादरम्यान नागपूर पोलीस दलात यापूर्वी जवळपास अर्ध्याअधिक नवख्या पोलीस निरीक्षकांना ठाणेदारी देण्यात आली होती. त्यामुळे अनेकांना ‘ठाणेदारी’ पदाची जबाबदारी झापलीच नाही. त्यामुळे आयुक्तांना मध्येच ठाणेदारांच्या बदल्या कराव्या लागल्या होत्या. सध्या नागपूर पोलीस दलातून १२ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या अन्य जिल्ह्यात झाल्या आहेत. तर नागपुरातही ८ पोलीस निरीक्षक बदलून आले आहेत.
बदली झालेल्या पोलीस निरीक्षकांना कार्यमुक्त करण्याचे आदेश आयुक्तालयातून काढण्यात आले. त्यामुळे आता त्यांच्या जागेवर अन्य पोलीस अधिकाऱ्याच्या नियुक्त्या करण्यात येणार असल्याची माहिती आहे. हे पाहता पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे आता गुन्हे शाखा, वाहतूक शाखा आणि ठाणेदारपदावर नव्याने नियुक्त्या देणार आहेत. येत्या दोन दिवसांत बदल्यांची यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
वाहतूक शाखेत जवळपास ६ ते ७ पोलीस निरीक्षकांची बदली होणार आहे. विशेष शाखा आणि आर्थिक शाखेतही बदली होणार आहे.
शहरातील जवळपास १० ते १२ पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून बदल्या होत आहेत. यातही ज्या पोलीस अधिकाऱ्यांना अनुभव आहेत त्यांनाच ‘ठाणेदारी’ मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.