नागपूर : सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांवर सोपविला आहे. यानुसारअध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आता शिवसेनेच्या ४० व ठाकरे गटाच्या १४ आमदारांना म्हणणे मांडण्यासाठी नोटिसा पाठविल्या. यानंतर आता शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी या नोटिसीला आपले उत्तर पाठवले असल्याची माहिती देण्यात आली आहे.
१६ आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीला दिरंगाई होत असल्याबाबत ठाकरे गटाकडून टीका केली जात आहे. यावर नार्वेकर यांनी स्पष्टीकरण दिले. त्या १६ आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीत दिरंगाई होणार नसून योग्य निर्णय घेतला जाईल, असे नार्वेकर म्हणाले.
इतकेच नाही तर शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र करण्याच्या कार्यवाहीला विलंब होत असल्याचा दावा ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
ज्यावेळी विधानसभा अध्यक्ष अपात्रतेच्या संदर्भात निर्णय घेत असतात तेव्हा ते ज्युडिशियल अधिकारी म्हणून काम करत असतात. याबाबत मला माहिती आहे. म्हणून अपात्रतेबाबत सुनावणी करण्यामध्ये कोणतीही दिरंगाई होणार नाही. योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे.