विज्ञान दिवसानिमित्त ‘कॉफी विथ मेयर’ : नवसंशोधकांचा सहभाग
नागपूर : नागपूर शहर आता जगपातळीवर ओळखले जाऊ लागले आहे. नव्या कल्पनांचे उगमस्थान म्हणून नागपूरची ओळख होत आहे. आपल्याजवळही नव्या कल्पना असतील तर त्या समोर आणा. महापौर इनोव्हेशन अवॉर्ड हे केवळ यासाठी एक निमित्त आहे. बदलत्या शहरात आपल्या नावीन्यपूर्ण कल्पनांचे योगदान द्या, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले.
नागपूर महानगरपालिका, मेयर इनोव्हेशन कौन्सिलच्या वतीने महापौर इनोव्हेशन अवॉर्ड अंतर्गत नवीन कल्पना आमंत्रित करण्यात आल्या होत्या. १ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या ‘हॅकथॉन’च्या माध्यमातून नागपूर शहरासाठी सुमारे ७५० इनोव्हेटिव्ह आयडियाज् स्पर्धकांनी सादर केल्यात.
त्यातून १०० आयडियाजची निवड करण्यात आली. याव्यतिरिक्त ज्या नागरिकांनी नवीन काही तरी शोधले आहे, ज्याचे पेटेंट मिळविले आहे, ज्या शोधावर त्यांना पुरस्कार मिळाले आहेत, अशा व्यक्तींकडूनही दुसऱ्या टप्प्यात ऑनलाईन प्रवेशिका मागविण्यात आल्या होत्या. यातूनही १०० नागरिकांची निवड करण्यात आली असून या सर्वांना आज (ता. २८) नागपूर महानगरपालिकेत आमंत्रित करण्यात आले होते. विज्ञान दिवसानिमित्त सिटी ऑपरेशन सेंटरमध्ये आयोजित ‘कॉफी वुईथ मेयर’ या कार्यक्रमात महापौर नंदा जिचकार यांनी त्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी महापौर इनोव्हेशन कौन्सिलचे कन्वेयर डॉ. प्रशांत कडू, समन्वयक केतन मोहितकर उपस्थित होते. पुढे बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, महापौर इनोव्हेशन अवॉर्ड हा उपक्रम नागपूरसाठी युनीक आहे. यातून अनेक चांगल्या कल्पना पुढे आल्यात. यातील बहुतांश कल्पनांचा नागपूर शहराच्या विकासासाठी किंवा अधिक चांगल्या सेवा मनपाच्या माध्यमातून देण्यासाठी उपयोग करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
मेयर इनोव्हेशन कौन्सिलचे डॉ. प्रशांत कडू यांनी यावेळी हॅकॉथॉन, ३ मार्च रोजी आयोजित ‘मेयर इनोव्हेशन अवॉर्ड’ समारंभ, परिक्षकांसोबत महापौरांचा संवाद याबाबतची भूमिका मांडली. हॅकॉथॉननंतर घेण्यात आलेले कार्यक्रम आणि पुढे होणाऱ्या कार्यक्रमांची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी उपस्थित नवसंशोधकांना सिटी ऑपरेशन सेंटरच्या माध्यमातून नागपूर शहरावर कसे नियंत्रण ठेवले जाते, याबाबत माहिती देण्यात आली. मेयर इनोव्हेशन कौन्सीलच्या वतीने डॉ. प्रशांत कडू यांनी सर्व स्पर्धकांना ३ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता कविवर्य सुरेश भट सभागृहात होणाऱ्या ‘मेयर इनोव्हेशन अवॉर्ड’ कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले.