संवाद साहेबांशी…सजग तरुणाईशी… नव्या स्वराज्याच्या उभारणीसाठी…कार्यक्रमाला तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद…
मुंबई : देशाचे भवितव्य घडविण्याची ताकद या युवा पिढीत आहे. त्यांची कुवत व ताकद लक्षात घ्यायला हवी. मात्र आत्ताच्या पिढीबद्दल गैरसमज निर्माण होत आहेत परंतु त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबई येथील युवा संवादात बोलताना व्यक्त केले.
संवाद साहेबांशी… सजग तरुणाईशी… नव्या स्वराज्याच्या उभारणीसाठी… हा अनोखा कार्यक्रम राष्ट्रवादीच्या मुंबई विद्यार्थी कॉग्रेसच्यावतीने वडाळा येथे आज पार पडला.
साचेबंद अभ्यास करणं यातून विद्यार्थ्यांनी बाहेर पडावे. त्यातून गुणात्मक बदल होत नाहीत. त्यामुळे अभ्यासक्रमात बदल केले पाहिजे. आव्हानाला तोंड देणारे अभ्यासक्रम तयार व्हावेत असे सांगतानाच अभ्यासक्रम तयार करणाऱ्यांमध्ये नवीन – जुनी यांचा समन्वय असावा असेही शरद पवार म्हणाले.
लोकशाही आहे सर्वांना बोलण्याचा, निवडून येण्याचा अधिकार आहे. प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार आहे. मात्र चुकीचे प्रतिनिधी सध्या येताना दिसत आहेत. आज हे मोठ्या प्रमाणात घडतंय. याला आवर घालायचा असल्यास जनतेने जागृत राहून अशा व्यक्तीला खड्यासारखे बाजुला करायला हवे असेही शरद पवार म्हणाले.
महाविद्यालयीन प्रश्नावर बोलताना शरद पवार यांनी लोकशाही नुसार महाविद्यालयाचा प्रतिनिधी निवडला जावा त्यासाठी विद्यार्थ्यांमधून प्रतिनिधी निवडणूक घ्यावी यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार यांनी लॉ अभ्यासक्रमात सतत बदल व्हायला हवेत. जर बदल केले नाहीत तर तुम्ही आऊटडेटेड व्हाल. त्यामुळे आधुनिक अभ्यासक्रम घेण्याची खबरदारी घेण्याबाबत तज्ज्ञांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले.
सीईटीबाबत बोलताना विद्यार्थ्यांचे वर्षे वाया जावू नये. ८ महिने जरी वाया गेले तरी त्यांचे भवितव्य धोक्यात येते त्यामुळे ४० ते ४५ दिवसांपेक्षा अधिक कालावधी असता कामा नये यासाठी सरकारकडे आग्रह धरणार असल्याचे स्पष्ट केले.
पीएचडीबाबत बोलताना दहा दिवसापुर्वी इंदोरला एका कार्यक्रमाला गेल्याचे सांगताना पीएचडीचे विद्यार्थी बसले होते.त्यांनी संपर्क करुन सांगितले की, इथल्या सरकारने अंमलबजावणी केली नसल्याने स्कॉलरशिप मिळाली नाही. तीच स्थिती इथल्या मागच्या सरकारने करुन ठेवली आहे. त्यामुळे आत्ताच्या सरकारने याची गांभीर्याने दखल घ्यावी आणि तसा निर्णय घ्यावा याबाबत चर्चा करणार असल्याचेही शरद पवार यांनी सांगितले.
याचवेळी एका विद्यार्थीनीने एक वेगळा प्रश्न विचारला त्यात तिने चंद्रकांत पाटील यांनी तुमच्यावर पीएचडी करणार असल्याचे म्हटले आहे. त्यावर तुमचं मत काय असं विचारलं असता पीएचडी पोस्ट ग्रॅज्युएटनंतर तीन वर्षाने करता येते मात्र चंद्रकांत पाटील यांना माझ्यावर पीएचडी करायला दहा ते बारा वर्षे लागतील असा टोला शरद पवार यांनी लगावताच सभागृहात एकच हंशा पिकला.
या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात शरद पवार यांच्याशी युवक युवतींनी थेट संवाद साधला आणि आपले प्रश्न मांडले. यामध्ये लॉ, सीईटी, रिसर्च, मेडिकल, आदींसह विद्यापीठांतर्गत येणार्या प्रश्नांना शरद पवार यांनी योग्य आणि तितकीच समर्पक उत्तरे दिली.
आमचं सरकार बाबू निर्माण करणार नाही तर २ लाख रुपये पगार घेणारा युवक निर्माण करेल असा विश्वास व्यक्त करतानाच युवकांसाठी सरकार वेगळं स्कील निर्माण करत असल्याची माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
भारत हा युवा देश आहे. युवकांची अपेक्षा, आशा पुर्ण करण्याची जबाबदारी सरकारची असल्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.
महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर साहेबांनी माझ्याकडे कौशल्य विकास विभागाचे काम दिले आहे. त्यामुळे युवकांनी त्यांच्याकडील वेगवेगळ्या आयडीया दिल्या पाहिजेत असे आवाहन करतानाच सरकारच्या पोर्टल वर ५० लाख बेरोजगार झाले आहेत. पोर्टल वरील नाव कमी करु नका. ते दाखल करा युवकांना वेगवेगळे रोजगार नक्कीच दिले जातील असे आश्वासन नवाब मलिक यांनी यावेळी दिले.
विद्यार्थी अध्यक्ष अमोल मातेले यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि मुंबई अध्यक्ष आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, विद्यार्थी अध्यक्ष अमोल मातेले, प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, मुंबई युवक अध्यक्ष निलेश भोसले, प्राचार्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. शिवारे उपस्थित होते.