नागपूर: शहरातील हुडकेश्वर परिसरात मानसोपचार तज्ज्ञ म्हणून काम करणाऱ्या इसमाने त्याच्याकडे काऊन्सिलिंगसाठी येणाऱ्या शेकडो महिला, मुली, तरूणींचे लैंगिक शोषण केल्याचे घृणास्पद प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली. आरोपी विरोधात तिसरा गुन्हा दाखल झाला आहे. तसेच या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता एसआयटी चौकशी होणार असल्याची माहितीही समोर आली आहे.
मानेवाडा रोड येथील रहिवासी विजय घैवाल (४७) असे आरोपी मानसोपचार तज्ज्ञाचे नाव आहे. तो नागपूरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून तो मानसोपचार तज्ञ म्हणून काम करत होता. गेल्या 7-8 वर्षांपासून त्याचे हे कारनामे सुरू होते. आरोपीने आतापर्यंत अनेक मुली आणि महिलांचे लैंगिक शोषण केल्याची माहिती समोर आली असून पोलीसांनी जप्त केलेल्या त्याच्या कंप्यूटरमध्ये अनेक व्हिडीओजही आढळले आहेत.
आरोपी पीडित महिलांचे अश्लील फोटो काढून, व्हिडीओज तयार करून तो त्यांना ब्लॅकमेल करायचा आणि वारंवार त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवायचा. धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या मानसोपचार तज्ञाच्या पत्नीलाही आपल्या पतीच्या या काळया कृत्यांची, कारनाम्यांची माहिती होती. तरीही ती गप्प बसली, पतीच्या या कृत्यात तिचाही सहभाग असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. आता या आरोपीविरोधात तिसरी तक्रार दाखल झाली आहे.
अटक आणि तपासाची व्याप्ती वाढली-
पोलिसांनी आरोपीला प्रॉडक्शन वॉरंटवर तुरुंगातून अटक केली आहे आणि त्याला गुरुवारी न्यायालयात हजर केले जाईल. आतापर्यंत १०-१५ पीडितांच्या तक्रारी पोलिसांपर्यंत पोहोचल्या आहेत, परंतु खरा आकडा यापेक्षा खूप जास्त असण्याची भीती आहे.
या प्रकरणात आणखी खुलासे होण्याची शक्यता –
पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल म्हणाले की, आरोपींनी केवळ व्हिडिओ बनवले नाहीत तर ते इतरांसोबत शेअरही केले. यामुळे आरोपींची यादी आणि पीडितांची संख्या वाढू शकते. महिला आणि बाल संरक्षण विभागाअंतर्गत झोन-४ च्या उपायुक्त रश्मिता राव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
पोलीस विभाग सतर्क –
पोलिसांनी सर्वसामान्यांना आवाहन केले आहे की जर कोणाला या प्रकरणाबाबत माहिती द्यायची असेल किंवा तक्रार नोंदवायची असेल तर त्यांनी संकोच न करता पुढे यावे. या संवेदनशील प्रकरणात, पीडितांची ओळख गुप्त ठेवली जाईल.