मुंबई : राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी काल सादर केला. यावर आता विरोधकांच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अर्थसंकल्पावर भाष्य करत सरकारवर हल्लाबोल केला.
शेतक-यांना कर्जमाफी, शेतमालाला हमीभावावर अर्थसंकल्पात घोषणा नाही. शेतक-यांना मोफत विजेची पोकळ घोषणा, ‘लाडकी बहिण’चा भाजपा युती सरकारकडून विश्वासघात, २१०० रुपये देण्याचा उल्लेख नाही. महाभ्रष्टयुती सरकारकडून महाराष्ट्र कर्जबाजारी, आठ लाख कोटींचे कर्ज,राज्याचे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त, अशा विविध मुद्द्यांवरून सपकाळ यांनी सरकारला धारेवर धरले. महाराष्ट्र आता थांबणार नाही, हे म्हणणाऱ्या महायुती सरकारने महाराष्ट्राला मागे नेले असून…हा अर्थसंकल्प महाराष्ट्राला देशोधडीला लावणारा असल्याची बोचरी टिकाही सपकाळ यांनी केली.
महाराष्ट्राचा अर्थसंकल्प विधिमंडळात सोमवार १० मार्च रोजी जाहीर झाल्यानंतर बुलढाण्यात माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, अर्थसंकल्प हा नेहमीप्रमाणे आकड्यांचा खेळ असून मागील पानावरून पुढे असा अर्थसंकल्प आहे. कोणत्याही घटकाला यातुन काहीही फायदा होणार नाही. राज्यावर आठ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त असून उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे.
निवडणूक दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करता सरकारने राज्यातील जनतेचा विश्वासघात केला आहे. राज्यात आर्थिक बेशिस्तीचा कारभार सुरु असून महाराष्ट्र आता थांबणार नाही, तर भाजपा युती सरकार राज्याला कर्जबाजारी करून देशोधडीला लावणार असेच दिसते आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला.