मुंबई : भाजपच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार भारती पवार यांच्या प्रचाराच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज दिंडोरीत सभा आयोजित करण्यात आली. यावेळी मोदी यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला.
लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे गट आणि शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होईल. ठाकरे गट जेव्हा काँग्रेसमध्ये विलीन होईल, तेव्हा मला बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येईल. त्यांना खूप दु:ख होईल,असे मोदी म्हणाले. कारण बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की, ज्यादिवशी शिवसेना ही काँग्रेस होत आहे, असे वाटेल त्यादिवशी शिवसेना संपवून टाकेल. याचा अर्थ नकली शिवसेनेचा पत्ता राहणार नाही. हा विनाश बाळासाहेब ठाकरे यांना सर्वाधिक दु:खी करत असेल, अशी खोचक टीका नरेंद्र मोदी यांनी केली.
नकली शिवसेनेने बाळासाहेबांच्या प्रत्येक स्वप्नाला चूर केले आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते की, अयोध्येत भव्य राम मंदिराचे निर्माण व्हावं. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द व्हावं. हे स्वप्न पूर्ण झाले. पण याने सर्वाधिक चीड या नकली शिवसेनेला होत आहे.
काँग्रेसने प्राण प्रतिष्ठाच्या निमंत्रणाला ठोकर मारली. नकली शिवसेनेनेसुद्धा तेच केले, असा घणाघात मोदी यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर केला.काँग्रेससमोर गुडघं टेकणाऱ्या नकली शिवसेनेला शिक्षा देण्याचं मन पूर्ण महाराष्ट्राने बनवले आहे.