नागपूर : विमानांमध्ये एअर होस्टेसच्या धर्तीवर शिवनेरी तळांवर शिवनेरी सुंदरीची नियुक्ती करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. परिवहन विभागाच्या निर्णयावरून राजकारण चांगलेच तापले आहे. सरकार आणि परिवहन समिती सभापती भरत गोगावले यांच्यावरही हल्लाबोल करत आहेत. याच पार्श्वभूमीवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही सरकारवर हल्लाबोल केला.
गतिमान कसलं? हे तर महायुतीचे दिशाहीन सरकार आहे.महायुती सरकारमध्ये मंत्री होऊ न शकलेले भरत गोगावले यांनी एसटी महामंडळाची जबाबदारी स्वीकारल्यावर पहिला निर्णय घेतला तो ‘शिवनेरी सुंदरी‘ चा. येथे एसटी बसची अवस्था खराब आहे. बसमधील छप्पर तुटले, बसमधून पाऊस आल्यानंतर कधी पाणी गळती होते, बस बंद पडतात, बस स्टँडवर महिलांना चांगली स्वच्छतागृह नाही हे सर्व प्रश्न सोडून यांनी निर्णय घेतला काय तर बस सुंदरीचा, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
काँग्रेसचा जागावाटपाचा मुहूर्त ?
विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपात आम्ही खूप पुढे गेलो आहोत. नवरात्रीमध्ये अधिकाधिक उमेदवारांची नावे आम्ही घोषित करणार आहोत. बऱ्याच जागांवर एकमत झाले आहेत. काही थोड्या थोड्या जागांवर महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांचे दावे आहेत. त्यासाठी आठ ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर या दरम्यान मॅरेथॉन बैठका घेऊन लवकरच निर्णय जाहीर करण्यात येईल.