नागपूर– देशभरात गणेश विसर्जन मिरवणुका थाटात पार पडल्या. नागपुरात ठिकठिकाणी भाविकांनी जल्लोषात मिरवणूक काढली.यादरम्यान शहरात सर्वत्र पोलिसांचा फौजफाटा तैनात होता. मात्र अलीकडे नागपुरात पोलिसांच्या भन्नाट डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
नागपुरातील हुडकेश्वर पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी व् कर्मचाऱ्यांनी डान्सचा मनमुराद आनंद लुटला. याचा व्हिडिओ देखील समोर आला असून यामध्ये पोलीस अधिकारी आणि कर्मचारी गणवेशात नसून बंगाली व फेटे घालून थिरकतांना दिसत आहेत.
पोलिसांच्या विसर्जन मिरवणुकीतील या भन्नाट डान्सला उपस्थितांनी देखील दाद दिली. हुडकेश्वर पोलिस स्टेशनचे थानेदार जगवेंद्रसिंग राजपूत यांनी आपल्या कर्मचारी व् अधिकारी यांच्या सोबत मिळून डांस केल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर त्यांचा हा डान्स व्हिडीओ तुफान व्हायरल झाला . व्हायरल होणार हा हा व्हिडीओ गणेश विसर्जन मिरवणुकीचा असल्याची माहिती ‘नागपूर टुडेला’ मिळाली आहे.
दरम्यान गणेशोत्सवात पोलीस 24 तास कर्तव्यावर असतात. या काळात त्यांना स्वत:च्या घरच्या गणपतीची सेवा करण्यासाठी देखील वेळ मिळत नाही. बाहेरच्या बाहेर ड्युटीवर असताना सर्वसामन्यांची देखभाल करत असताना ते बाप्पांच दर्शन घेत असतात. सणासुदीला कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ते 11 च्या 11 दिवस रात्र डोळ्यात तेल घालून पाळत ठेवत असतात. दिवसभर ऊन, वारा, पाऊस सोसत ते सर्वसामान्यांसाठी दिवसरात्र झटत असतात. या सर्व दिवसांत पोलिसांवर अतिप्रचंड ताण असतो, शरीराने आणि मानसिकरित्या ते थकलेले असतात.मात्र असे असले तरी पोलिस बेभान होऊन मिरवणूकीत नाचत असल्याचे पाहून त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे.
-रविकांत कांबळे