मुंबई : ठाणे महानगरपालिका रुग्णालयात एकाच रात्रीत १८ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण घटनेनंतर एकच खळबळ उडाली. हे सर्व सरकारी अनास्थेचे बळी असून चौकशी करायची असेल तर या राज्यातील भ्रष्ट सरकारचीच करा, अशी संतप्त प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. आज प्रसार माध्यमांशी बोलतांना त्यांनी हे विधान केले आहे.
ठाणे रुग्णालयात निर्दोष लोकांचा मृत्यू झाला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शहरातील शासकीय रुग्णालयाची ही स्थिती आहे तर राज्यातील ग्रामीण भागातील सरकारी रुग्णालयातील स्थिती काय असेल ? असा संतप्त सवाल पटोले यांनी उपस्थित केला. राज्यात सरकारी आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहे. रुग्णालयात डॉक्टर, नर्सेस नाहीत व औषधेही नाहीत आणि सरकार मात्र १५ ऑगस्टपासून सर्व सरकारी रुग्णालयातून मोफत उपचार देऊ अशी घोषणा करते, ही केवळ लोकांची दिशाभूल करण्यात आलेली घोषणा असल्याचे पटोले म्हणाले.
दरम्यान भाजपाचे केंद्र आणि राज्य सरकार जनतेच्या पैशांची लूट करत आहे. भ्रष्टाचाराचे विक्रम या सरकारने केले आहेत. शेतकरी हवालदिल आहे, पेरण्या नाहीत, जिथे पेरणी झाली तिथे पीक वाळून जात आहे, अवकाळी पावसाचा मोबदला अद्याप दिला नाही, शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. कंत्राटी नोकर भरती केली जात आहे, परिक्षा शुल्काच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची विद्यार्थ्यांकडून लूट केली जात आहे. कृत्रिम महागाईने जनता त्रस्त आहे, हे सर्व प्रश्न उचलून धरण्यासाठी आम्ही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ३ सप्टेंबर पासून राज्यात पदयात्रा सुरू करणार असून पहिला टप्पा १७ सप्टेंबरपर्यंत असेल. त्यानंतर गणेशोत्सव व सणानंतर दुसरा टप्पा सुरु करण्यात येईल, अशी माहिती पटोले यांनी दिली.