नागपूर: देशाचे मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी जाहिर केलेल्या ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानांतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त रविवारी, १ ऑक्टोबरला नागपूर शहरातील हजारो नागरिकांनी एक तास स्वच्छतेसाठी श्रमदान केले. नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरातील विविध स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांच्या सहकार्याने शहरातील ऐतिहासिक स्थळे, इमारती, महत्वाची ठिकाणे तसेच रहिवासी वस्त्या अशा ७३ ठिकाणी श्रमदानातून स्वच्छता करण्यात आली.
नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी शहरभर आयोजित या अभियानामध्ये नागरिकांनी नोंदविलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल नागरिकांचे अभिनंदन केले. देशाचे मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना केलेल्या आवाहनावरून नागपूर शहरातही स्वच्छतेसाठी एक तास स्वच्छता करण्यात आली. नागपूर शहरातील हेरिटेज स्थळे व इमारती, ऐतिहासिक धार्मिक स्थळे यासोबतच विविध उद्यान आणि रहिवाशी भागांमध्ये स्वच्छतेसाठी स्वयंसेवी संस्थांसोबतच स्थानिक नागरिकांनी घेतलेला पुढाकार हे अभियानाचे यश आहे. नागरिकांनी आपल्या परिसरात नियमित स्वच्छता केल्यास स्वच्छतेच्या दृष्टीने शहराचे चित्र लवकरच बदलेल, असा विश्वास आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी व्यक्त केला.
नागपूर शहरातील जागतिक कीर्तीची दीक्षाभूमी, हेरिटेज स्थळ कस्तुरचंद पार्क, प्रधान डाक कार्यालय (जीपीओ), ऐतिहासिक श्रीमंत महाराणी सती काशीबाई साहेब भोसले राजघाट (काशी बाई देवस्थान), गांधीसागर तलाव व चाचा नेहरू उद्यान, भारतमाता व डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान सीए रोड, सोनेगाव तलाव, सक्करदरा चौक, तिरंगा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, रेल्वे स्टेशन, डॉ. आंबेडकर उद्यान वैशाली नगर, मनपा मुख्यालय यासारख्या विविध ७३ ठिकाणी नागपूर महानगरपालिकेद्वारे १५० स्वयंसेवी संस्था आणि सुमारे २० हजाराहून अधिक नागरिकांच्या सहकार्याने स्वच्छता करण्यात आली. या अभियानामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार सर्वश्री कृष्णा खोपडे, मोहन मते, विकास कुंभारे, माजी महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांच्यासह माजी नगरसेवक यांनी देखील उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
मनपा लक्ष्मीनगर झोन कार्यालयाद्वारे दीक्षाभूमी परिसरामध्ये मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त श्री. सुनील लहाने, मुख्य अभियंता श्री. राजीव गायकवाड, अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार, उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांनी स्वच्छता श्रमदान केले. या ठिकाणी ग्रीन व्हिजील फाउंडेशन, दत्ता मेघे महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, मनपा विवेकानंद हिंदी माध्यमिक शाळा, रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालय, पीआरएसआय सोसायटी, जेडी स्पोर्ट्स फाउंडेशन तसेच एनसीसी च्या विद्यार्थ्यांचे सहाकार्य लाभले.
मनपाच्या गांधीबाग झोन कार्यालयाद्वारे श्रीमंत महाराणी सती काशीबाई साहेब भोसले राजघाट (काशी बाई देवस्थान) येथील स्वच्छता श्रमदानात मध्य नागपूरचे आमदार श्री. विकास कुंभारे, माजी महापौर श्री. दयाशंकर तिवारी, सहायक आयुक्त श्री. गणेश राठोड, माजी नगरसेवक श्री. बंडू राऊत, विभागीय अधिकारी श्री सुरेश खरे, श्रीकांत आगलावे, पन्नालाल देवडीया शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती गीता दांडेकर यांनी सहभाग नोंदविला. या श्रमदानामध्ये लोटस कल्चरल अँड स्पोर्टिंग असोसिएशन संस्थेने सहकार्य केले. लकडगंज झोनद्वारे भारतमाता व डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये आमदार श्री. कृष्णा खोपडे, मनपा निगम सचिव प्रफुल्ल फरकासे यांनी स्वच्छतेसाठी श्रमदान केले. हनुमान नगर झोनद्वारे सक्करदरा चौक येथील स्वच्छता श्रमदानामध्ये आमदार श्री. मोहन मते, सहायक आयुक्त श्रीमती पुष्पगंधा भगत यांच्यासह विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
धंतोली झोनद्वारे केंद्रीय संचार ब्यूरो क्षेत्रीय कार्यालयाच्या सहकार्याने गांधीसागर तलाव व चाचा नेहरू उद्यानात स्वच्छता श्रमदान करण्यात आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. सोपनदेव पिसे, केंद्रीय संचार ब्यूरोचे क्षेत्र अधिकारी श्री. सौरभ खेकडे, सहायक आयुक्त तथा माहिती तंत्रज्ञान विभाग संचालक श्री. महेश धामेचा, लायन्स क्लबचे अध्यक्ष श्री. नितीन वर्मा आदींनी श्रमदान केले. नागपूर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे सुमारे ३५० विद्यार्थी आणि लॉयन्स क्लबच्या स्वयंसेवकांचे सहकार्य लाभले.
धरमपेठ झोनद्वारे ऐतिहासिक कस्तुरचंद पार्क येथे भारतीय वायू सेनेच्या मेंटेनन्स कमांडंट मुख्यालयाच्या सहकार्याने स्वच्छता श्रमदान करण्यात आले. एअर मार्शल व्ही.के. गर्ग, सहायक आयुक्त श्री. प्रकाश वराडे, नागपूर@२०२५चे मल्हार देशपांडे, प्रवीण सिंग, संदीप अग्रवाल, मॅट्रिक्स वॉरीयर्सचे नंदीनी मेंढजोगे, आदर्श दुधनकर आदींनी स्वच्छता श्रमदान केले. प्रधान डाक कार्यालय (जीपीओ) येथे कार्यालयाचे कर्मचारी, मनपा परिवहन सेवेतील कर्मचारी आणि तेजस्विनी महिला मंचच्या सदस्यांद्वारे श्रमदान करण्यात आले. उपायुक्त श्री. सुरेश बगळे, परिवहन विभागाचे प्रशासकीय अधिकारी श्री. रवींद्र पागे, प्रभारी डाकपाल श्री. अनील कुमार आर., सहायक डाक अधीक्षक विलास भोगे, वरीष्ठ डाक अधीक्षक श्रीमती रेखा रिजवी, क्रीडा अधिकारी डॉ.पीयूष आंबुलकर, तेजस्विनी महिला मंचच्या श्रीमती किरण मुंधडा आदींनी स्वच्छता श्रमदान केले. नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये अग्निशमन विभागाच्या कर्मचा-यांनी स्वच्छता श्रमदान केले.
शहरात विविध ठिकाणी आयोजित अभियानामध्ये मनपाचे उपायुक्त सर्वश्री निर्भय जैन, रवींद्र भेलावे, सहायक आयुक्त सर्वश्री मिलींद मेश्राम, घनश्याम पंधरे, हरीश राउत, अजय कुरवाडे, मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. बी.पी. चंदनखेडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, समाजविकास अधिकारी डॉ. रंजना लाडे, कार्यकारी अभियंता सर्वश्री रवींद्र बुंधाडे, रक्षमवार, अजय पझारे, अजय मानकर, गिरीश वासनिक, विजय गुरूबक्षाणी, उज्ज्वल धनविजय यांच्यासह झोनल अधिकारी, मलेरिया फायलेरिया विभागाचे कर्मचारी आदी उपस्थित होते.
या स्वयंसेवी संस्थांनी नोंदविला सहभाग
मनपाद्वारे शहरातील वेगवेगळ्या ७३ ठिकाणी आयोजित स्वच्छता श्रमदान अभियानामध्ये ग्रीन व्हिजील फाउंडेशन, सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट, नागपूर@२०२५, तेजस्विनी महिला मंच, मार्केट असोसिएशन, लिडर क्लब, किंग कोब्रा, ताजुद्दीन बाबा ट्रस्ट, लोटस ऑर्गेनायझेशन, कल्पवृक्ष ट्री फाउंडेशन, आयजीएसएसएस, एसएचजीएस, गुरूद्वारा टीम या स्वयंसेवी संस्थांनी सहभाग नोंदविला.
विद्यार्थ्यांचे वेशभूषेसह श्रमदान
शहरातील विविध श्रमदान ठिकाणी नागपूर महानगरपालिकेच्या शाळांसह इतर शाळांच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व अन्य थोर राष्ट्रपुरूषांची वेशभूषा करून श्रमदान केले. मनपाच्या विविध शाळांच्या विद्यार्थ्यांसह राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विविध महाविद्यालयांतील राष्ट्रीय सेवा योजनेचे सुमारे ३५० विद्यार्थी, एनसीसी चे विद्यार्थी आदींनी उत्स्फूर्तपणे स्वच्छता श्रमदानात सहभाग नोंदविला.