नवी दिल्ली : दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील (NCR) जवळपास १०० शाळांना बॉम्ब हल्ल्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. आज ( बुधवारी) पहाटे ४ वाजता या शाळांना ईमेलद्वारे ही धमकी देण्यात आली. याप्रकरणी केंद्रीय यंत्रणांकडून तपास सुरू करण्यात आला असून ईमेल पाठवणाऱ्याचा शोध घेतला जात आहे. तसेच तपास यंत्रणांकडून शाळेचा परिसर खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच या शाळांच्या परिसरात बॉम्ब स्कॉड देखील तैनात करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
‘या’ शाळांना आला धमकीचा ईमेल –
धमकीचा ईमेल मिळालेल्या शाळांमध्ये मयूर विहार येथील मदर मेरी स्कूल, द्वारका येथील दिल्ली पब्लिक स्कूल, चाणक्यपुरी येथील संस्कृती स्कूल, वसंत कुंज येथील दिल्ली पब्लिक स्कूल आणि साकेतमधील एमिटी स्कूल यांचा समावेश आहे.
दिल्लीचे पोलीस उपायुक्त देवेश कुमार महला यांनी या प्रकरणासंदर्भात सकाळी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. दिल्लीतील शाळांना पहाटे धमकी मेल मिळाल्याची तक्रार आम्हाला मिळाली होती. त्यानुसार आम्ही संपूर्ण शाळांची झडती घेतली.
मात्र, या ठिकाणी आम्हाला कोणीही बॉम्ब सदृष्य वस्तू आढळली नाही.आम्ही या प्रकरणाचा तपास गांभीर्याने करत आहोत. नागरिकांनी शांतता बाळगावी घाबरण्याची आवश्यकता नाही, असे आवाहनही त्यांनी केले आहे.