नागपूर : शहरातील ‘लि मेरिडियन’ हॉटेलमधील एका कॉर्पोरेट कार्यक्रमात चक्क ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण झाल्याचा लाजिरवाणा प्रकार घडला. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. या व्हिडिओमध्ये तोकड्या कपड्यांमध्ये तरुणी अश्लील डान्स करत होत्या आणि कंपनीचे कर्मचारी या तरुणीवर पैशांची उधळण करत होते. अश्लील नृत्य करणा-या तरुणीला काहीजण स्पर्शही करण्याचा प्रयत्न करत होते. याप्रकरणी बेलतरोडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
हा कार्यक्रम एका मोठ्या सोलर इन्स्ट्रुमेंट्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनीने आयोजित केलेल्या डीलर्स मेळाव्याचा भाग होता. या कार्यक्रमात शहरातील अनेकांनी सहभाग घेतला होता.मायक्रोटेक इंटरनॅशनल कंपनीचे शुभम मेहरा, ली मेरिडियनचे संचालक (विक्री) अमितराज कुंडू आणि सहाय्यक व्यवस्थापक अंकुश लोन्साने अशी आरोपींची नावे आहेत.
पीआय वैजयंती मांडवधरे यांनी या माहितीला दुजोरा दिला. व्हायरल झालेल्या नृत्याच्या व्हिडिओ क्लिपच्या आधारे गुन्हा नोंदविण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. मायक्रोटेक कंपनी सौर उपकरणांच्या विक्रीत गुंतलेली असल्याची माहिती आहे. हॉटेलमध्ये डीलर्ससाठी खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुंबईहून आलेल्या काही महिलांनी कार्यक्रमात बॉलीवूड गाण्यांवर अश्लील नृत्य केले. डीलर्सनी मुलींवर पैशांची उधळण केली. आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.