नागपूर: एका कंपनीचे बनावट संकेतस्थळ तयार करून फसवणूक करण्याच्या गुन्ह्यांत अटक करण्यात आलेले तीन कॅमेरून विदेशी नागरिकांना मंगळवारी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी सशर्त जामीन मंजूर केला.
रॅाल ॲमी सोंगा, सौंटे जॅक्सन सातो, थेमवी रॅाबर्ट नॅागवा सर्व रा. कॅमेरून अशी जामीन मिळालेल्या आरोपींची नावे आहेत. नागपुरातील जे. के. सोल्यूशन कंपनीचे बनावट संकेतस्थळ तयार करून ते इंडिया मार्ट या संकेतस्थळावर प्रसिद्ध करून अनेक बनावट उत्पादनांची जाहिरात करण्यात आली. यामागे लोकांना फसवण्याचा व पैसे लाटण्याचा उद्देश होता. या प्रकरणात जे. के. सोल्यूशन कंपनीचे संचालक भूषण साबळे यांनी पोलिसांत तक्रार दिला.
१३ ॲागस्टला पोलिसांनी भांदविचे कलम ४१९, ४२०, ४६८ आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कलम ६६(क) आणि (ड) अंतर्गत गुन्हा दाखल केला व सायबर पोलिसांनी तपास करून २१ ॲागस्टला आरोपींना दिल्लीतून अटक केली. या प्रकरणात आरोपींना ७ दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर २७ ॲागस्टला न्यायालयाने त्यांची कारागृहात रवानगी केली. ॲड. मंगेश राऊत आणि ॲड. नाझीया पठाण यांनी आरोपांच्या जामीनासाठी अर्ज केला. अर्जावर न्यायदंडाधिकारी संग्राम जाधव यांच्यासमक्ष सुनावणी झाली.
आरोपींतर्फे ॲड. मंगेश राऊत यांनी न्यायालयाला सांगितले की, आरोपींना खोट्या गुन्ह्यांत अडकवले. त्यांच्याविरूद्ध कोणतेही ठोस आरोप नसून केवळ संशयाच्या आधारावर त्यांना अटक करण्यात आली. ते केवळ विदेशी नागरिक आहेत म्हणून त्यांना जामीन नाकारणे योग्य होणार नाही. गुन्ह्याचा स्वरूप लक्षात घेऊन त्यांना जामीन मंजूर करण्यात यावा, असा युक्तिवाद केला. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपींना न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश न सोडण्याची अट घालून सशर्त जामीन मंजूर केला.