नागपूर: मुंबई विद्यापीठातील ऑनलाईन मार्किंग सिस्टीम (OSM) च्या गोंधळाच्या चौकशीसाठी माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव श्रीनिवासन यांच्या अध्यक्षतेखाली व्हिजेटीआय चे संचालक हिरेन पटेल आणि आय आय टी,पवई मुंबईचे डॉ. दीपक पाठक ही तीन सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. समितीने चौकशी अहवाल दिल्यानंतर ज्यांच्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले, त्या सर्वांविरुध्द कठोर कारवाई करण्यात येईल, असे ठाम आश्वासन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. विनोद तावडे यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिले.
मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाईन मुल्यांकनामुळे अनेक पदविकांचे निकाल प्रलंबित राहील्यामुळे विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान पदवीत्तर अभ्यासक्रम, प्रवेशाचा उडालेला बोजवारा आदी विषयाची लक्षवेधी सूचना विधानसभेमध्ये अतुल भातखळकर, सुनील शिंदे आदी सदस्यांनी उपस्थित केली होती.
मुंबई विद्यापीठातील ऑनलाईन मार्किंग सिस्टीम (OSM) च्या गोंधळाची विभागाने चौकशी केली. सदर चौकशी अहवाल राज्यपालांकडे सुपूर्द केला. त्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या तत्कालीन कुलगुरुंचा राजीनामा घेण्यात आला, असेही श्री. तावडे यांनी सांगितले.