नागपूर: एकिकडे पुण्यातील कल्याणीनगर भागात दारु पिऊन भरधाव पोर्शे कार चालवत अल्पवयीन मुलाने दोन तरुणांना चिरडल्याची घटना ताजी असतानाच नागपुरात आज अशाच प्रकारची घटना घडली आहे.
नागपूरमधील महाल भागातील झेंडा चौकाजवळ दारूच्या नशेत भरधाव कारने पायी चालत आलेल्या जोडप्याला धडक दिली.या घटनेत एक पुरुष, एक महिला आणि एक तीन महिन्यांचं बाळ जखमी झाले आहे.
कारचालक आणि इतर प्रवासी मद्यधुंद अवस्थेत कार चालवत असल्याचे समोर आल्यानंतर संतप्त जमावाने कारची तोडफोड करत त्यातील एकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. तर कारमधील इतर दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले.या जखमी जोडप्याला नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. तर फरार आरोपींचा शोध घेत पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.