पुणे: डीएसके गैरव्यवहारप्रकरणी बँक अाॅफ महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष सुशील मुहनाेत, कार्यकारी संचालक राजेंद्रकुमार गुप्ता, विभागीय व्यवस्थापक नित्यानंद देशपांडे यांना न्यायालयाने शुक्रवारी ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला.
तपासात सहकार्य करावे तसेच त्यांनी तपासासाठी बाेलावल्यास हजर राहावे. सध्याचा राहता पत्ता, माेबाइल क्रमांक तपास अधिकाऱ्यांना द्यावा, पुराव्यांशी काेणतीही प्रकारची छेडाछाड करू नये, न्यायालयाच्या परवानगीशिवाय भारत साेडून जाऊ नये अशा प्रकारच्या अटी न्यायालयाने घालून दिल्या अाहेत.
बँक अधिकाऱ्यांचे वकील हर्षद निंबाळकर म्हणाले, संबंधित बँक अधिकाऱ्यांकडे पाेलिसांचा तपास पूर्ण झाला असून त्यांच्याजवळील कागदपत्रे ताब्यात घेण्यात अाल्याने त्यांना जामीन देण्यात यावा, असा युक्तिवाद केला हाेता. दरम्यान, डीएसके यांचे सनदी लेखापाल सुनील घाटपांडे व डी.एस.कुलकर्णी लिमिटेडचे उपाध्यक्ष राजीव नेवासकर यांच्या जामीन अर्जावरही या वेळी युक्तिवाद करण्यात अाला.
डीएसकेंच्या जामिनावर ५ जुलै राेजी होणार सुनावणी
डी.एस.कुलकर्णी अाणि त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्या जामिनासाठी त्यांचे वकील श्रीकांत शिवदे यांनी न्यायालयात अर्ज दिला अाहे. ५ जुलै राेजी संबंधित जामीन अर्जावर निर्णय घेण्यात येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले अाहे. दरम्यान, डीएसके यांचे सीए घाटपांडे, डीएसके कंपनीचे उपाध्यक्ष नेवासकर यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी बचाव पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण झाला. साेमवारी याप्रकरणी सरकारी वकील प्रवीण चव्हाण बाजू मांडतील.
रवींद्र मराठे आणि गुप्ता यांचे अधिकार काढले
महाराष्ट्र बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे आणि कार्यकारी संचालक राजेंद्र कुमार गुप्ता यांचे सर्व अधिकार शुक्रवारपासून बँकेने काढून घेतले अाहेत. केंद्र सरकारच्या दोन प्रतिनिधींच्या उपस्थितीत शुक्रवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात अाला. यापुढील सर्व व्यवस्थापकीय अधिकार बँकेचे कार्यकारी संचालक ए.एस राऊत यांना प्रदान करण्यात आले आहे. याबाबतची माहिती बँकेच्या वतीने मुंबई शेअर बाजाराला कळवण्यात आली आहे.