वर्धा : नागपूर मार्गावरील सेलू जवळ जंगलपूर फाट्याजवळ परिवहन महामंडळाच्या एसटीचा अचानक टायर पंक्चर झाल्याने बस थांबली असता,तीन बसेस एकमेकांना भिडल्याने अपघात घडला. यात वाहन चालकासह २० प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. आज सकाळच्या सुमारास हा विचित्र अपघात घडला.
माहितीनुसार, नागपूर-वर्धा मार्गावर महाबळा जवळ असलेल्या जंगलापूर फाट्याजवळ परिवहन महामंडळाची नागपूर वरून वर्धेच्या दिशेने येणारी एसटी क्रमांक एम एच ४० वाय ५५८५ या गाडीचा टायर पंक्चर झाल्याने ती बस रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आली होती. त्या बसमधील असलेल्या प्रवाशांना दुसरी बस क्रमांक एम एच ०६ एस ८०९० या गाडीमध्ये बसविण्यासाठी ती एसटी सुद्धा थांबली असता,भरधाव वेगाने येणारी लालपरी क्रमांक एम एच २० बी एल ४१०४ या एसटीने उभ्या असलेल्या बसेला जबर धडक दिली.
या अपघातात वाहन चालकासह २० प्रवासी जखमी झाले आहे. याप्रकरणी सेलू पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. या विचित्र अपघातामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती.