नागपूर : शहरातील मध्यमवर्ती रेल्वे स्थानकावर गुरुवारी सकाळी थरारक घटना घडली आहे. एका वयस्कर प्रवाशाला बॅटरी कारने एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावार जायचे होते. त्यांच्यासोबत एक नातवाईक होते. बॅटरी कार चालकाने तिकडे जाण्यास नकार दिल्याने प्रवाशाच्या नातेवाईकाने त्याच्यासोबत वाद घालत त्याच्यावर तलवार काढल्याची माहिती समोर येत आहे.
एका वयोवृद्ध प्रवाशाला मुख्य प्रवेशद्वाराकडून (फलाट क्रमांक १) फलाट क्रमांक ८ वर जायचे होते. त्यांनी तशी विनंती बॅटरी कारचालकाला केली. चालकाने कार फलाट क्रमांक ८ वर जाऊ शकत नाही. कारचा आकार मोठा आहे आणि तिकडे जाणारा पूल रुंद असल्याचे त्यांना सांगितले. हे संभाषण ऐकून प्रवाशाच्या नातवाईकाने फलाट क्रमांक ८ वर नेण्यासाठी कार चालकाला विनंती केली. मात्र ती विनंतीही चालकाने नाकारल्याने प्रवाशाच्या नातेवाईकाचा संतापाचा पारा चढला.
त्याने चालकावर हल्ला करण्यासाठी चक्क तलवार काढली.तलवार बघून चालक घाबरला आणि त्याने त्याठिकाणाहून पळ काढला. रेल्वे सुरक्षा दलाचे पोलीस निरीक्षक आर. एल. मीना यांनी प्रकरणाच्या माहितीसाठी कारचालकाला बोलावून घेतले असून पुढील तपास सुरु केला आहे.