नागपूर : भारतीय संविधानाचे शिल्पकार, समाजसुधारक आणि दलितांचे तारणहार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती संपूर्ण देशभरात आणि विशेषतः नागपूरमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. नागपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीवर अभिवादनासाठी हजारो अनुयायींचा जनसागर लोटला होता.
रविवारच्या मध्यरात्रीपासूनच जयंतीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली. संविधान चौकात रात्री १२ वाजता बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर केक कापून आणि जोरदार फटाक्यांच्या आतषबाजीत जयंती साजरी करण्यात आली. या वेळी उपस्थित अनुयायांनी “जय भीम” च्या घोषणांनी परिसर दणाणून टाकला.
सोमवार, १४ एप्रिल रोजी सकाळपासूनच दीक्षाभूमीवर बाबासाहेबांच्या अस्थींचे दर्शन घेण्यासाठी देशाच्या विविध भागातून आलेल्या अनुयायांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. काही ठिकाणी रक्तदान शिबिरे, बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर आधारित व्याख्याने, चित्रप्रदर्शने व सामूहिक वाचनाचे कार्यक्रमही पार पडले.
दीक्षाभूमी परिसर फुलांनी सजवलेला होता आणि स्थानिक स्वयंसेवकांनी भाविकांच्या सोयीसाठी पिण्याच्या पाण्याचे, अन्नदानाचे व आरोग्य तपासणीचे मोफत stalls उभारले आहेत.
या दिवशी नागपूर शहरात विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आणि अनेक ठिकाणी बाबासाहेबांच्या विचारांवर आधारित भित्तिचित्रे रंगवण्यात आली.हा उत्सव हा केवळ एक श्रद्धांजली नव्हे, तर समतेचा, बंधुतेचा आणि न्यायाचा संदेश देणारा प्रेरणादायी दिवस ठरला.