चिखलदरा तालुक्यातील मोथा गावाजवळ आज सकाळी वाघाचा मृतदेह आढळून आला. वाघाच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र विदर्भात एकापाठोपाठ वाघांचे मृत्यू होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
मेळघाट प्रादेशिक वनविभाग अंतर्गत येणाऱ्या चिखलदरा वनपरिक्षेत्रातील मोथा गावातील नागरिकांना आज सकाळी गावापासून काही अंतरावर वाघाचा मृतदेह दिसला. त्यांनी या घटनेची माहिती वन विभागाला दिली.
वन विभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वाघाच्या शरीरावर कुठलेही वर्ण अथवा घाव आढळले नाहीत. यामुळे वाघाचा मृत्यू नेमका कश्यामुळे झाला हा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, मेळघाटात २०१६ मध्ये २ वाघांची शिकार करण्यात आली होती. यानंतर आता वाघाचा मृतदेह आढळून आल्याने मेळघाटात पुन्हा खळबळ उडाली आहे.
वाघाच्या मृत्यू मागील नेमकं कारण अजूनही समोर आलेले नाही. मात्र लवकरच वनखात्याकडून त्याची तपासणी करून मृत्यूचं कारण स्पष्ट केलं जाणार आहे. मागील काही दिवसात विषप्रयोगातून वाघाचा मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे.