नागपूर : जिल्ह्यातील पवनी वनपरिक्षेत्रात पुन्हा वाघाने दहशत निर्माण केली आहे.वाघाने शेतकऱ्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पवनी वनपरिक्षेत्रांतर्गत दादोहा (घोटी) येथे राहणारे शेतकरी रामराव चापडे हे कुटुंबासह घरात झोपले होते.
दरम्यान, रात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घराबाहेर बसलेल्या कुत्र्यावर वाघाने हल्ला केला. आवाज ऐकून शेतकऱ्याने घराचा दरवाजा उघडला. कुत्रा शेतकऱ्याच्या दिशेने धावला आणि वाघानेही त्याच कुत्र्याच्या मागे धावत शेतकऱ्यावर हल्ला केला.
कुटुंबीयांनी आरडाओरडा केल्यानंतर वाघाने घटनास्थळावरून पळ काढला. गंभीर जखमी शेतकऱ्याला देवलापार ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिथे त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना देण्यात आली, त्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. त्याचबरोबर उपचाराचा संपूर्ण खर्च वनविभाग उचलणार असल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी जयेश तायडे यांनी दिली आहे.