एक गंभीर जखमी, यवतमाळला हलविले
पांढरकवडा : गावालगत बांधण्यात येणाऱ्या हनुमान मंदिराच्या बांधकामात मदत करण्यासाठी जाणाऱ्या तिघा तरुणांवर एका वाघाने अचानक हल्ला केला. यात तिघेही जखमी झाले. ही घटना बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पाटणबोरीपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या कवठा (वाऱ्हा) येथे घडली. या घटनेने पंचक्रोशीत वाघाची दहशत पसरली आहे.
उन्हाळ्याला सुरुवात होताच, या भागात वाघ-मानव संघर्षाला सुरुवात झाली आहे. कवठा (वाऱ्हा) गावालगतच्या एका शेतात हनुमान मंदिराचे बांधकाम केले जात आहे. या बांधकामावर मदत करण्यासाठी कवठा येथीलच वैभव गंगाधर भोयर (२७), प्रशांत ईरदंडे (३५) व संकेत मिसार (१८) हे तिघेजण शेताच्या रस्त्याने जात असताना दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अमरदीप धडसनवार यांच्या शेतातून अचानक या तिघांपुढे एक वाघ येऊन उभा राहिला. काही कळायच्या आत वाघाने थेट एकाचवेळी तिघांवर हल्ला चढविला. त्यामुळे तिघेही एकमेकांच्या अंगावर पडले. या तिघांनीही जीवाच्या आकांताने आरडाओरड करून वाघाला हाकलण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात यश आले नाही.
वाघाने वैभववर हल्ला चढविला. त्यात वैभव गंभीररित्या जखमी झाला, तर प्रशांत ईरदंडे याच्या हाताला व छातीला जबर दुखापत झाली. संकेत मिसारच्या पायात लचक भरली. या तिघांपैकी एकाने तुतारीच्या काठीने वाघाला हुसकून लावण्याचा प्रयत्न केला. तिघांच्या आरडाओरडीने गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यानंतर वाघाने घटनास्थळावरून पलायन केले.
गावकऱ्यांनी गंभीर जखमी झालेल्या वैभवला पाटणबोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणून त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला यवतमाळ येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी, मयूर सुरवसे आपल्या ताफ्यासह घटनास्थळावर पोहोचले. वनविभागाच्या या पथकाने वाघाचा शोध घेतला. मात्र, तो कुठेही आढळून आला नाही.
या भागात फिरत असलेल्या वाघाची संख्या सध्या तरी एक आहे. मात्र सावधगिरी म्हणून या परिसरात ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले असून लवकरच या परिसरात किती वाघ आहेत, याचा आकडा निश्चित करता येईल, असे मयूर सुरजुसे, वनपरिक्षेत्र अधिकारी,पांढरकवडा यांनी सांगितले.
योगेश पडोळे पांढरकवडा